Join us

IPL 2018: चिमुकल्या झिवाचा पुणेकरांना 'बाय-बाय', धोनीही झाला भावुक

इन्स्टाग्रामवर धोनीनं पोस्ट केला लेकीसोबतचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 14:41 IST

Open in App

पुणे : आयपीएल 2018 चे साखळी सामने रविवारी संपले. पुण्याच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा संघ अखेरचा सामना खेळला. या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी थोडा भावुक झाला. यानंतर धोनीनं चेन्नईच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचे आभार मानले. यासाठी त्यानं खास एक व्हिडीओ पोस्ट केला. विशेष म्हणजे यामध्ये धोनीची मुलगी झिवादेखील त्याच्या सोबत दिसते आहे. व्हिडीओमध्ये धोनी झिवाचा हात पकडून ड्रेसिंग रुमच्या दिशेनं जाताना दिसतो आहे. दोघेही एकमेकांसोबत ड्रेसिंग रुमकडे जाणाऱ्या पायऱ्या चढत आहेत. या व्हिडीओच्या शेवटी धोनी आणि झिवा कॅमेऱ्याकडे पाहून सर्वांना 'बाय-बाय' म्हणतात. 'या ड्रेसिंग रुममध्ये जाण्याची या हंगामातील ही शेवटची वेळ आहे. यावेळी ड्रेसिंग रुममध्ये जाताना झिवादेखील माझ्यासोबत होती. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल, प्रोत्साहनाबद्दल पुण्याचे खूप खूप आभार. चेन्नईच्या संघानं तुमचं मनोरंजन केलं असेल, अशी आशा आहे,' असं धोनीनं या व्हिडीओसोबतच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. 

फिक्सिंग प्रकरणानंतर चेन्नईचा संघ दोन वर्षे आयपीएल खेळला नव्हता. दोन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या चेन्नईचं होम ग्राऊंड एम. ए. चिदंबरम स्टेडियम होतं. मात्र कावेरी पाणी वाटपावरुन सुरू असेलल्या आंदोलनाचा फटका चेन्नईच्या संघाला बसला. सामना सुरू असताना खेळाडूंच्या दिशेनं बूट फेकण्यात आल्याची घटना घडली. यानंतर चेन्नईच्या संघाचं होम ग्राऊंड बदलण्यात आलं. चेन्नईतील चाहत्यांना पुण्यापर्यंत येता यावं, यासाठी संघाकडून मोफत रेल्वे प्रवासाची ऑफर देण्यात आली. चेन्नईचा सामना पाहण्यासाठी 'विसलपोडू एक्स्प्रेस'नं अनेकजण चेन्नईहून पुण्याला यायचे.

टॅग्स :जीवा धोनीचेन्नई सुपर किंग्सआयपीएल 2018महेंद्रसिंग धोनी