Join us  

IPL 2018 : राहुलच्या धडाकेबाज फलंदाजीनंतरही पंजाबच्या 155 धावा

राहुलने 30 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर पंजाबला नायरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 29 धावांवर बाद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 9:52 PM

Open in App
ठळक मुद्देबंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आर. अश्विनला त्यानंतरच्या चेंडूवर बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. अश्विनने 21 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 33 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

बंगळुरु : किंग्ज इलेव्हन पंजाबचा लोकेश राहुल आयपीएलमध्ये पुन्हा एकदा बरसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. पण अन्य फलंदाजांना चांगली फलंदाजी करता न आल्यामुळे पंजाबला 155 धावांवर समाधान मानावे लागले.

बंगळुरुने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि लोकेश राहुलने या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला. पहिल्याच षटकात राहुलने दोन षटकार आणि एक चौकार लगावत 16 धावांची वसूली केली. त्यावेळी राहुलने पहिल्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावल्याची आठवण आली. पण राहुलला या सामन्यात जलद अर्धशतक पूर्ण करता आले नाही. राहुलबरोबर पंजाबचा दुसरा सलामीवीर मयांक अगरवालही चांगल्याच फॉर्मात होता. त्यानेही झटपट तीन चौकार लगावले. राहुल आणि मयांक दोघेही आता पंजाबच्या गोलंदाजीची पिसे काढणार, असे वाटत होते. पण उमेश यादवचे चौथे षटक पंजाबसाठी सर्वात वाईट ठरले. कारण या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेशने मयांकला बाद केले, यष्टीरक्षक क्विंटन डी'कॉकने त्याचा अप्रतिम झेल टीपला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर उमेशने आरोन फिंचला पायचीत पकडले, फिंचला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. उमेशने या षटकाच्या सहाव्या चेंडूवर युवराज सिंगला ज्यापद्धतीने त्रिफळाचीत केले, ते नजरेचे पारणे फेडणारे होते.

एका षटकात तीन फलंदाज बाद झाल्यावरही राहुलने आपल्या फटक्यांना मुरड घातली नाही. राहुलने करुण नायरला साथीला घेत धावांची भर घालण्याचे काम सुरुच ठेवले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली. राहुल दमदार फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांची पिसे काढत होता. तो झटपट अर्धशतक झळकावेल, असे वाटले होते. पण वॉशिंग्टन सुंदरने राहुलला सर्फराज खानकरवी झेलबाद केले. राहुलने 30 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर पंजाबला नायरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 29 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने चांगली फलंदाजी केली आणि धावफलक हलता ठेवला. अश्विन दमदार फलंदाजी करत होता. अश्विनने 19व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार खेचला. पण त्यानंतरच्याच चेंडूवर तो बाद झाला. बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आर. अश्विनला त्यानंतरच्या चेंडूवर बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. अश्विनने 21 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 33 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

टॅग्स :आयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकिंग्ज इलेव्हन पंजाब