मुंबई - आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या अकराव्या हंगामाच्या वेळापत्रकाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यात अनेक बदलांमुळे यंदाच्या आयपीएलची उत्सुकता अधिकच लागलेली आहे. त्यातूनच सोशल मीडियामध्ये आयपीएलच्या नव्या मोसमाच्या वेळापत्रकाविषयी वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. मात्र आता आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या तारखांबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. आयपीएल-11 चा थरार 7 एप्रिलपासून रंगणार असून, 27 मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत माहिती देताना स्पर्धेचा उदघाटन सोहळा, सलामीचा सामना आणि अंतिम लढतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा उदघाटन सोहळा 6 एप्रिल रोजी मुंबईत रंगणार आहे. त्यानंतर स्पर्धेतील सलामीची लढतही 7 एप्रिल रोजी मुंबईत खेळवली जाईल. तर अंतिम लढत 27 मे रोजी मुंबईतच होईल.
आयपीएल-2018 चा यंदाचा हंगाम एकूण 51 दिवस चालणार आहे. मात्र स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान, आयपीएलच्या 11व्या सत्रासाठी लीगमधील सर्व 8 फ्रेंचाईजींनी संघातील काही प्रमुख खेळाडू आपल्याकडे कायम राखले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक फ्रेंचाईजीने आपले प्रमुख खेळाडू जाहीर केले. आता फेब्रुवारी महिन्यात आयपीएल खेळाडूंचा बंगळुरूमध्ये लिलाव होणार असून यावेळी उर्वरीत सर्व खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील.
विविध संघांनी कायम राखलेले खेळाडू Csk - महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा
DD : रिषभ पंत, क्रिस मॉरिस, श्रेयस अय्यर.
KXIP : अक्षर पटेल
KKR : सुनील नरेन, आंद्रे रसेल.
MI : रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह.
RR : स्टीव्ह स्मिथ.
RCB : विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, सर्फराज खान.
SH : डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार.