T20 World Cup: इंझमाम म्हणाला भारतच वर्ल्डकपचा दावेदार, पाक विरुद्धच्या सामन्याबाबत केलं मोठं विधान! वाचा...

T20 World Cup 2021: पाकिस्तानचा दिग्गज माजी कर्णधार इंझमाम उल हक यानं यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारतच प्रबळ दावेदार असल्याचं विधान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 04:30 PM2021-10-21T16:30:11+5:302021-10-21T16:34:21+5:30

inzamam ul haq picks india as favourite to win ongoing t20 world cup in gulf conditions | T20 World Cup: इंझमाम म्हणाला भारतच वर्ल्डकपचा दावेदार, पाक विरुद्धच्या सामन्याबाबत केलं मोठं विधान! वाचा...

T20 World Cup: इंझमाम म्हणाला भारतच वर्ल्डकपचा दावेदार, पाक विरुद्धच्या सामन्याबाबत केलं मोठं विधान! वाचा...

Next

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. यातच पाकिस्तानचा दिग्गज माजी कर्णधार इंझमाम उल हक यानं यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारतच प्रबळ दावेदार असल्याचं विधान केलं आहे. यूएईतील परिस्थिती उपखंडातील परिस्थीतीसारखीच आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाची विजेतेपदासाठी शक्यता अधिक आहे, असं इंझमामनं म्हटलं आहे. 

"भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना सहजपणे जिंकला. उपखंडातील अशा खेळपट्ट्यांवर भारत जगातील सर्वात घातक ट्वेन्टी-२० क्रिकेट संघ ठरतो. भारतानं १५५ धावांचं लक्ष्य सहजपणे गाठलं आणि विराट कोहलीलाही फलंदाजीची या सामन्यात गरज भासली नाही. कोणत्याही स्पर्धेत नेमका कोणता संघ जिंकेल असा दावा केला जाऊ शकत नाही. पण असं असलं तरी ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघाच्या विजयाची शक्यता अधिक आहे", असं इंझमाम उल हक यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात म्हटलं आहे. 

भारतीय संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. फलंदाजीसोबतच गोलंदाजी देखील मजबूत आहे. जसजसे सामने होत जातील तसं यूएईच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना साथ मिळेल. यात रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंना मोठी मदत होईल, असंही इंझमाम म्हणाला. 

भारत-पाक सामन्याबाबत काय म्हणाले इंझमाम?
"२४ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणारा सामना स्पर्धेच्या अंतिम सामन्यासारखाच आहे. इतर कोणत्याही सामन्याला जितकं महत्त्व नसेल तितकं महत्त्व या सामन्याला असणार आहे. २०१७ साली देखील चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत-पाक सामन्यानं स्पर्धेची सुरुवात आणि शेवट झाला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले ते दोन्ही सामने फायनल सारखेच होते. त्यामुळे भारत-पाक सामना जो संघ जिंकेल त्या संघाचं मनोबल प्रचंढ वाढेल आणि संघावरील ५० टक्के दबाव देखील संपुष्टात येईल", असं इंझमाम म्हणाले. 

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी स्पर्धांमध्ये आजवर वनडे आणि ट्वेन्टी-२० मिळून एकूण १२ सामने झाले आहेत. यात सर्व सामने भारतानं जिंकले आहेत. आयसीसीच्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये आजवर एकदाही पाकिस्तानला भारतावर विजय प्राप्त करता आलेला नाही. एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारत ७-० नं, तर ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर ५-० अशी बढत प्राप्त केलेली आहे. 

Web Title: inzamam ul haq picks india as favourite to win ongoing t20 world cup in gulf conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app