Join us

विराटच्या माघार घेण्यामागे आईची प्रकृती कारण आहे का? कोहलीच्या भावानं केला खुलासा 

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 12:40 IST

Open in App

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली. वैयक्तिक कारणास्तव माघार घेत असल्याचे त्याने रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व संघ व्यवस्थापनाला कळवले. BCCI नेही त्याच्या निर्णयाचा आदर राखून उगाच काही तर्क लावू नका अशी विनंती सर्वांना केली. पण, विराटने माघार का घेतली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. काहींच्या मते त्याची पत्नी अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याने त्याने माघार घेतली आहे. पण, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनंतर त्याच्या आईची प्रकृती खराब असल्याचे कारण समोर आले. त्यात विराटचा भाऊ विकास कोहलीची पोस्ट व्हायरल झाली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला, तेव्हा विराटचे नाव त्यात होते. पण, पहिल्या कसोटीच्या तीन दिवस आधी विराटने माघार घेत असल्याचे बीसीसीआयला कळवले. त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतेय आणि त्यानुसार विराटच्या माघारीमागे वेगळंच कारण समोर येत आहे. या पोस्टमध्ये आईची प्रकृती खालावल्यामुळे विराटने माघार घेतल्याचा दावा केला गेला आहे. त्यामुळे विराट तिसऱ्या कसोटीआधी संघात दाखल होण्याचीही शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.

पण, विराटचा भाऊ विकास याने हे वृत्त खोडून काढले आहे. त्याने पोस्ट लिहिली की, आईच्या प्रकृतीवरून काही चुकीच्या बातम्या पसरत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. मला हे स्पष्ट करू द्या की आईची प्रकृती चांगली आहे. माझी लोकांना आणि मीडियाला विनंती आहे की कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता अशा बातम्या पसरवू नका.

 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंड