Join us  

टीम इंडियाच्या महिला संघाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाकडून सलग नववी मालिका गमावली

वन-डे मालिकेत भारताच्या पदरी ०-३ अशी मानहानीकारक हार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 2:02 PM

Open in App

India Women Cricket Team , INDW vs AUSW: भारतीय महिला क्रिकेट संघाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत विक्रमी ३३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने मात्र १४८ धावाच केल्या. दीडशतकीही मजल न मारता आलेल्या भारतीय महिला संघाला तब्बल १९० धावांनी सामना गमवावा लागला. यासह टीम इंडियाने वन-डे मालिकादेखील 0-3 ने गमावली.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत फोबी लिचफिल्डच्या शतकाच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली होती. फोबीने या डावात ११९ धावा केल्या, ज्यात १६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. कर्णधार एलिसा हिलीनेही ८२ धावांची दमदार खेळी केली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पूर्णपणे शरणागती पत्करली. संपूर्ण संघ १४८ धावांवर गारद झाला. स्मृती मंधानाकडून थोडीशी झुंज पाहायला मिळाली. टीम इंडियासाठी स्मृती मंधानाने सर्वाधिक २९ धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरही केवळ ३ धावा करून बाद झाली.

कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या भारताला वन-डे मालिकेत विचित्र कामगिरीचा फटका बसला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही सलग नववी मालिका गमावली. हा एक विचित्र विक्रम झाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत ५३ एकदिवसीय सामने झाले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने केवळ १० सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने ४३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय महिला क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया