India Tour of England : विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान शर्मा, आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांच्याशिवाय टीम इंडिया आज पहिल्या सराव सामन्यात मैदानावर उतरली. कौंटी एकादश संघाविरुद्धच्या सामन्यात अनुभवी फलंदाज नसल्याचा फटका टीम इंडियाला बसला. ३ बाद ६७ धावा अशी टीम इंडियाची अवस्था असताना लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला सावरले. पण, राहुल रिटायर्ड हर्ट ( नाबाद) झाला अन् टीम इंडियाचा डाव कोसळला. पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाचे ९ फलंदाज माघारी परतवण्यात कौंटी एकादशच्या गोलंदाजांना यश आलं.
मयांक अग्रवाल व रोहित शर्मा यांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. लिंडन जेम्सनं या दोघांनाही स्वस्तात माघारी पाठवले. रोहित शर्मा ३३ चेंडूंत ९ धावांवर आणि मयांक अग्रवाल ३५ चेंडूंत २८ धावांवर माघारी परतला. चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी ही जोडी टीम इंडियाला सावरेल असे वाटत असताना पुजारा २१ धावांवर यष्टिचीत होऊन बाद झाला. विहारीनेही २४ धावांवर विकेट टाकली. पण,
लोकेश राहुल व
रवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. लोकेश १५० चेंडूंत ११ चौकार व १ षटकार खेचून १०१ धावांवर रिटायर्ड झाला. भारतानं ४ बाद १०७ वरून २३४ धावांपर्यंत मजल मारली आहे. जडेजा व शार्दूल ठाकूर मैदानावर आहेत. अन्य फलंदाजांना संधी मिळावी म्हणून लोकेश रिटायर्ड झाला.
राहुल माघारी परतला तेव्हा टीम इंडियाच्या ५ बाद २३४ धावा झाल्या होत्या. त्यानंतर रवींद्र जडेजानं १४६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ७५ धावा केल्या. शार्दूलनं २० धावांची खेळी केली. दिवसअखेर भारतानं ९ फलंदाज गमावत ३०६ धावा केल्या आहेत. क्रेग माईल्सनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर लिंडन जेम्स व लाएम पॅटर्सन-व्हाईट यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.