Join us  

Asia Cup : टीम इंडियाचे जेतेपदाच्या सामन्यात बांगलादेशसमोर लोटांगण; कसाबसा गाठला शतकी पल्ला

भारतीय संघाने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बांगलादेशसमोर लोटांगण घातलेले पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 1:10 PM

Open in App

कोलंबो, आशिया चषक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा : भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बांगलादेशसमोर लोटांगण घातलेले पाहायला मिळाले. उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे गटातील अव्वल भारत आणि बांगलादेश यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. दोन्ही संघांची कामगिरी पाहता भारतीय संघ वरचढ ठरेल, असे वाटत होते. मात्र, बांगलादेशच्या गोलंदाजांची कमाल केली. त्यांच्या अचूक माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांना फार काळ तग धरता आले नाही. कोलंबो येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे गट साखळी फेरीतील कामगिरीच्या जोरावर भारत आणि बांगलादेश यांना अंतिम फेरीत धडक मारली. भारताने अ गटात तीनही सामने जिंकून 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. बांगलादेशनेही ब गटातील तीनही सामने जिंकत अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुवेश पारकर ( 4), अर्जुन आझाद ( 0) आणि तिलक वर्मा ( 2) हे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 8 धावांत माघारी परतले. त्यानंतर कर्णधार ध्रुव जुरेल ( 33) आणि शास्वत रावत ( 19) यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु टीम इंडियानं पुन्हा लोटांगण घातले. करण लाल ( 37) याने अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी करताना संघाला शतकी पल्ला पार करून दिला. भारताचा संपूर्ण संघ 32.4 षटकांत 106 धावांत तंबूत परतला. बांगलादेशच्या मृत्यूंजय चौधरी ( 3/18) आणि शमीम होसैन ( 3/8) यांनी टीम इंडियाचे कंबरडे मोडले.

टॅग्स :भारतबांगलादेश