जोहान्सबर्ग : सलामीवीर शिखर धवन (७२) याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या टी २० सामन्यात २८ धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या २०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भुवनेश्वर कुमारने पाच बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कंबरडे मोडले. आफ्रिकेचा संघ ९ बाद १७५ धावाच जमवू शकला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी वेगवान खेळी केल्या. रोहित याने दोन चौकार आणि दोन षटकार ठोकत पहिल्याच षटकांत १८ धावा कुटल्या. मात्र आफ्रिकेचा पदार्पण करणारा ज्यूनिअर डाला याने त्याला बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाºया सुरेश रैना याने १५ धावा केल्या. त्यानंतर कोहली आणि धवन यांनी फटकेबाजी सुरूच ठेवली. पॉवर प्लेमध्ये भारताकडून सर्वाधिक ७८ धावा कुटल्या. याआधी भारताने नागपूरमध्ये २००९ मध्ये श्रीलंकेविरोधात ७७ धावांची खेळी केली होती. धवन याने २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३९ चेंडूत १० चौकार आणि २ षटकार लगावत ७२ धावा केल्या. १५ व्या षटकांत फेहलुकवायोने त्याला बाद केले. पांडे (२९) व हार्दिक पांड्या (१३) यांनी भारताला २०३ धावांचा टप्पा गाठून दिला. भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २० मध्ये उभारलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
भारताच्या भल्यामोठ्या आव्हानाच्या विरोधात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजयासाठी २८ धावा कमी पडल्या. स्मट्स आणि हेंड्रीक्स यांनी दमदार सुरुवात केली. मात्र भुवनेश्वर कुमारने तिसºया षटकांत स्मट्सला बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. हेंड्रीक्स याने ५० चेंडूत ७० धावांची खेळी केली. त्याने एक षटकार आणि चार चौकार लगावले. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. भुवनेश्वरने चार षटकांत २४ धावा देत ५ गडी बाद केले. त्याने स्मट्स, हेंड्रीक्स, कर्णधार डुमिनी, क्लासेन आणि मॉरीस यांना बाद केले. बेहारादीन याने २७ चेंडूत ३९ धावा केल्या.
आयपीएलमध्ये महागडा भारतीय ठरलेल्या जयदेव उनाडकटला एकच बळी मिळाला. त्याने फेहलुकवायोला (१३) बाद केले. चहल आणि पांड्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर जसप्रीत बुमराह याला एकही गडी बाद करता आला नाही.
धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. क्लासेन गो. डाला २१, शिखर धवन झे. क्लासेन गो. फेहलुकवायो ७२, सुरेश रैना झे. व गो डाला १५, विराट कोहली पायचीत गो. तबरेझ २६, मनिष पांडे नाबाद २९, महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. मॉरिस १६, हार्दिक पांड्या नाबाद १३. अवांतर - ११. एकूण : २० षटकात ५ बाद २०३ धावा.
गोलंदाजी : डेन पॅटरसन ४-०-४८-०, ज्यूनिअर डाला ४-०-४७-२; ख्रिस मॉरिस ४-०-३९-१; तबरेझ शम्सी ४-०-३७-१; जेजे स्मट्स २-०-१४-०; अँडिले फेहलुकवायो २-०-१६-१.
स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने भारताविरुद्धच्या टी२० मालिकेतूनही बाहेर पडला आहे. यामुळे यजमान द. आफ्रिकेच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पाचव्या एकदिवसीय सामन्याच्या एक दिवस आधी एबीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याने तंदुरुस्ती चाचणी यशस्वी केली होती. परंतु, टी२० सामन्यादरम्यान त्याच्या दुखापतीची तीव्रता वाढली.
दक्षिण आफ्रिका : जेजे स्मट्स झे. धवन गो. भुवनेश्वर १४, रीझा हेंड्रीक्स ७०, जेपी ड्युमिनी झे. रैना गो. भुवनेवर ३, डेव्हिड मिल्लर झे. धवन गो हार्दिक ९, फरहान बेहरादीन झे. मनिष गो. चहल ३९, हेन्रिक क्लासेन झे. रैना गो. भुवनेश्वर १६, अँडिले फेहलुकवायो झे. चहल गो. उनाडकट १३, ख्रिस मॉरिस झे. झे. रैना गो. भुवनेश्वर ०, डेन पॅटरसन धावबाद (हार्दिक - धोनी) १, ज्यूनिअर डाला नाबाद २, तबरेझ शम्सी नाबाद ०. अवांतर - ८. एकूण : २० षटकात ९ बाद १७५ धावा.
गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-२४-५; उनाडकट ४-०-३३-१; बुमराह ४-०-३२-०; हार्दिक ४-०-४५-१; युझवेंद्र चहल ४-०-३९-१.