Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम!

राज्यात शुक्रवारी 7862 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 38,461 इतकी झाली आहे. एकूण 1 लाख 32,625 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत.

By स्वदेश घाणेकर | Updated: July 11, 2020 11:22 IST

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोना संकटात सामान्यांना घरीच राहण्याचं आवाहन करताना सर्व प्रशासकिय यंत्रणा, डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्माचारी, आरोग्य अधिकारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. यात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळेच आपण या सर्वांना 'कोरोना वॉरियर' असे संबोधत आहोत. या वॉरियरमध्ये भारतीय क्रिकेटपटूच्या आईचाही समावेश आहे आणि संकटकाळात त्यांच्या 'बेस्ट' कामाचं कौतुक होत आहे. 

राज्यात शुक्रवारी 7862 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 38,461 इतकी झाली आहे. एकूण 1 लाख 32,625 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 95647 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. लॉकडाऊमुळे मुंबईची लाईफलाईन रेल्वे बंदच असल्यामुळे सर्व भार हा बेस्ट बसवर आला आहे. डॉक्टर, पालिका कर्मचारी यांच्याप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे आणि भारतीय क्रिकेटपटूची आई या बेस्ट कंडक्टर म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे.

भारताच्या 19 वर्षांखालील संघातील सदस्य अथर्व अंकोलेकर याची आई वैदही या बस कंडक्टर आहेत. पहाटे 5.15 ते 10.30 अशी ड्युटी त्या करतात. कोरोना संकटात कामावर जाणं आव्हानात्मक असल्याचे त्या सांगतात. '' कोरोना संकटामुळे हे काम खूप आव्हानात्मक झाले आहे. येणारा प्रवासी कुठून आलाय आणि त्याची प्रकृती कशी आहे, याची आपल्यालाही कल्पना नसते. त्यामुळे भीती वाटते. या संकटात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी यांच्याप्रमाणे मी कर्तव्य बजावतेय याचा अभिमान वाटतोय,''असे वैदही यांनी सांगितले.

'लोकमत'शी बोलताना त्यांनी स्वतःचा एक अनुभव सांगितला. कोरोनाच्या भीतीमुळे मे महिन्यात त्या 15 दिवस कामावरच गेल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना निम्माच पगार मिळाला. त्यामुळे घर कसं चालवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर  उभा राहिला होता. ''स्वतःच्या या अनुभवावरून इतरांचा विचार करायला लागले. निम्मा पगार आला म्हणून माझ्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. लॉकडाऊनमुळे मागील तीन महिने अनेक जण घरीच बसून आहेत आणि आता नियम शिथिल झाल्यानंतर प्रत्येकाला कामावर जाण्याची घाई रोज मी पाहतेय. बस आल्यावर सोशल डिस्टन्सिंग विसरून प्रत्येक जण बसमध्ये चढण्यासाठी संघर्ष करताना पाहतेय. 2020 हे जगण्याचं वर्ष आपण म्हणतोय, पण त्यासाठी पैसाही हवाच ना?,'' असेही त्या म्हणाल्या.

कोरोनामुळे आयुष्य बदललं आहे, क्रीडा स्पर्धा होत नसल्यानं खेळाडूंचेही नुकसान होत आहे. अशा काळात अथर्वला मानसिक कणखर बनवण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागत आहे. कोरोनापूर्वीचं आयुष्य आणि आताचं यात तुम्हाला काय फरक जाणवतो आहे? या प्रश्नवार त्या म्हणाल्या,''पूर्वी बस तुडूंब भरलेली असायची आणि त्यांच्या मधून वाट काढून मी तिकीट द्यायचे. पण, आता बसमध्ये पाच व्यक्ती स्थँडिंग असूनही त्यांच्या बाजूने जाताना भीती वाटते. प्रवाशी आणि माझ्यात किती अंतर ठेवायला हवं याचा विचार सतत सुरू असतो. हा आजार स्वतःसोबतच कुटुंबीयांनाही होत आहे, त्यामुळे त्यांचा विचार डोक्यात सुरु असतो.''  

या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या युवा वर्ल्ड कप संघाचे अथर्वने प्रतिनिधित्व केलं होतं आणि भारतीय संघाला अंतिम सामन्यात बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. अथर्वचे वडील विनोद अंकोलेकर बेस्टमध्ये कंडक्टर होते. 2010 साली अथर्वच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या जागी वैदही यांना नोकरी मिळाली. अथर्व आता मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरासाठी गेल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईबेस्ट