- अयाझ मेमन
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बीसीसीआयने खूप संतुलित संघ निवडला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगल्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. पण तरी अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांच्यावरुन थोडा वाद रंगला. दोघेही अनुभवी खेळाडू असून त्यांच्यावर बीसीसीआयने खूप मेहनत घेतली होती. पण आता रायुडूला संघाबाहेर ठेवून त्याच्याजागी युवा लोकेश राहुलला संधी मिळाली आहे. दुसरीकडे युवा रिषभ पंतच्या जागी अनुभवी कार्तिकला संधी मिळाली आहे.
पंत आणि कार्तिक यांच्यातील निर्णय खूप विवादास्पद होता. निवडकर्त्यांच्या मते जर महेंद्रसिंग धोनीला महत्त्वाच्या सामन्यांतम जसे की उपांत्य सामन्यात काही दुखापत झाली, तर त्यावेळी फायदेशीर ठरणारा खेळाडू संघात असावा. माझे वैयक्तिक मत आहे की, पर्यायी खेळाडूकडे आपण भविष्यासाठी पाहत असतो. त्यामुळे माझ्यामते युवा खेळाडूला संधी मिळाली असती, तर भविष्यासाठी ती चांगली बाब ठरली असती. तरी सध्या निवडलेला संघ अत्यंत संतुलित दिसत आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होत असल्याने तिथे अतिरिक्त वेगवान गोलंदाज जाऊ शकला असता. पण गेल्यावेळी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तिथे फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भारताने चार प्रमुख वेगवान गोलंदाजांसह कुलदीप यादव व युझवेंद्र चहल या दोन फिरकीपटूंना संघात ठेवले आहे. याशिवाय रवींद्र जडेजाच्या रुपाने अतिरिक्त फिरकी गोलंदाजही घेतला आहे. त्याच्यासह अष्टपैलू केदार जाधवही असल्याने संघ काहीप्रमाणात फिरकी गोलंदाजीचा असल्याचे भासत आहे. ही गोष्ट चुकीची असल्याचेही मी म्हणणार नाही, कारण जडेजा उत्कृष्ट अष्टपैलू आहे.
सर्वांना विजय शंकरच्या निवडीवर आश्चर्य वाटत आहे. पण माझ्यामते असे नाही. गेल्या ६-८ महिन्यांत त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने चौथ्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकावर खेळताना चांगले प्रयत्न केले. त्याच्यात गुणवत्ता असून त्याची निवड सार्थ ठरु शकते. दुसरीकडे रिषभची निवड न झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मुख्य यष्टीरक्षक धोनी असताना त्याला पर्याय म्हणून ३३ वर्षीय खेळाडूऐवजी २२ वर्षीय खेळाडूला निवडले असते, तर त्या आत्मविश्वास उंचावला असता. या पुढचा विश्वचषक कार्तिक जवळपास खेळणार नाही हे नक्की आहे, त्यामुळे युवा पंतची निवड झाली असती, तर त्याला चांगला अनुभव मिळाला असता.
(संपादकीय सल्लागार)