ठळक मुद्देफलंदाज स्मृती मानधानाचा ICC कडून गौरव 2007नंतर गौरविण्यात आलेली पहिली भारतीय महिलाहरमनप्रीतकडे आयसीसीच्या ट्वेंटी-20 संघाचे कर्णधारपद
मुंबई : भारतीय महिला संघाची स्टायलिस्ट डावखुरी फलंदाज स्मृती मानधनाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ( ICC) गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कन्येला वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा राचेल हेयहोए फ्लिंट पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याशिवाय स्मृतीला वन डे सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. 22 वर्षीय स्मृतीला 2018च्या आयसीसी वनडे आणि ट्वेंटी-20 संघातही स्थान देण्यात आले आहे. स्मृतीने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत 12 वन डे सामन्यात 66.90च्या सरासरीने 669 धावा केल्या आहेत, तर 25 ट्वेंटी -20 सामन्यांत तिने 130.67च्या स्ट्राईक रेटने 622 धावा चोपल्या आहेत. स्मृतीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप ट्वेंटी-20 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तिने या स्पर्धेत पाच सामन्यांत 125.35च्या स्ट्राईक रेटने 178 धावा केल्या. आयसीसीच्या महिला क्रिकेटपटूच्या वन डे आणि ट्वेंटी-20 क्रमवारीत ती अनुक्रमे चौथ्या व 10व्या स्थानावर आहे.
आयसीसीचा हा मानाचा पुरस्कार जिंकणारी ती दुसरीच भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी 2007 मध्ये दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामीला वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. स्मृती म्हणाली,'' वर्षभर केलेल्या धावा, संघाला मिळवून दिलेले विजय याची ही पोचपावती आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे. या पुरस्कारामुळे मला भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे."
दरम्यान आयसीसीने सोमवारी वन डे व ट्वेंटी -20 संघ जाहीर केला. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्याकडे ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ट्वेंटी-20 संघात हरमनप्रीतसह भारताच्या स्मृती आणि पूनम यादव यांनी स्थान पटकावले आहे. वन डे संघात मात्र हरमनप्रीतला स्थान पटकावता आलेले नाही. स्मृती आणि पूनम या दोनच भारतीय खेळाडू वन डे संघात आहेत.