Join us  

भारतीय संघापुढे आव्हान विजयपथावर परतण्याचे, न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी२० लढत

पहिल्या सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघ शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी२० सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याच्या वज्रनिर्धाराने उद्या मैदानात पाऊल ठेवेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 4:32 AM

Open in App

आॅकलंड - पहिल्या सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघ शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी२० सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याच्या वज्रनिर्धाराने उद्या मैदानात पाऊल ठेवेल. बुधवारी भारताला टी२० क्रिकेटमध्ये धावांच्या अंतरात सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर लगेच दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाजवळ आत्ममंथन करण्यासाठी जास्त वेळ नव्हता.पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या बाजूने काहीच घडले नाही. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१९ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज टीम सीफर्टने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना ४३ चेंडूंत ८४ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांना त्याला रोखण्यासाठी विशेष व्यूहरचना आखावी लागेल. या लढतीत भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि खलील अहमद सर्वच महागडे ठरले.भारतीय संघ शुक्रवारी अहमदच्या जागी सिद्धार्थ कौल अथवा मोहम्मद सिराजला संधी देऊन शकतो. फिरकी गोलंदाज कृणाल पांड्या आणि युझवेंद्र चहल यांनी चांगली कामगिरी केली असली, तरी कुलदीप यादवला खेळवले जाऊ शकते. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने हा सामना ८० धावांनी गमावला. पहिला सामना गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ‘एक संघ म्हणून आम्ही लक्ष्याचा पाठलाग करण्यात तरबेज आहोत. आम्ही लक्ष्याचा पाठलाग करू शकू, असे वाटले होते; परंतु अपयशी ठरलो.’ स्वत: एका धावेवर बाद झालेला रोहित मोठी खेळी करण्याच्या इराद्याने खेळेल. त्याचप्रमाणे विश्वचषक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात असलेला ऋषभ पंत याचीही नजर मोठी खेळी करण्यावर असेल.अष्टपैलू विजय शंकरने १८ चेंडूंत २७ धावा केल्या. त्याला आणखी एक संधी मिळते का; अथवा संघ शुभमान गिल याला संधी देतो, हे आता पाहणे मनोरंजक ठरेल.दुसरीकडे मालिकेतील पहिला सामना जिंकून आनंदी असलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन म्हणाला की, ‘अशी जबरदस्त कामगिरी दररोज होत नसते. आम्ही लय कायम ठेवून मालिका जिंकू, अशी आशा आहे. सीफर्ट आणि कॉलीन मुन्रो यांनी फलंदाजीत, तर अनुभवी टीम साउथीने त्या सामन्यात गोलंदाजीत चमक दाखवत ३ बळी घेतले होते.’ (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघ :भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एम.एस. धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमान गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज.न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), डग ब्रासवेल, कॉलीन डे ग्रँडहोम, लोकी फर्ग्युसन, स्कॉट के, कोलिन मुन्रो, डेरिल मिशेल, मिशेल सँटेनर, टीम सेइफर्ट, ईश सोढी, टीम साउदी, रॉस टेलर, ब्लेयर टिकनर, जेम्स नीशाम.सामन्याची वेळ : दुपारी ११.३० वाजेपासून (भारतीय वेळेनुसार)

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघ