Join us

भारताचा अंतिम फेरीचा मार्ग सोपा; आज थायलंडविरुद्ध भिडणार

आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने भारताने आपली दुसरी फळी तपासून घेण्याची संधी साधली. या स्पर्धेत भारताने आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना संधी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 05:43 IST

Open in App

सिलहट (बांगलादेश) : जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाचा महिला आशिया चषक स्पर्धेतील अंतिम फेरीचा मार्ग सोपा झाला आहे. गुरुवारी भारतीय महिला थायलंडविरुद्ध खेळून दिमाखात अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरतील. या सामन्यात भारताचा विजय निश्चित मानला जात असला तरी, भारतीय खेळाडू थायलंडला कमी लेखण्याची चूक करणार नाहीत. 

याआधी साखळी फेरीत दोन्ही संघांदरम्यान झालेला सामना अत्यंत एकतर्फी झाला होता. यामध्ये भारतीयांनी थायलंडला अवघ्या ३७ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर केवळ ६ षटकांमध्ये बाजी मारली होती. त्यामुळे थायलंडला उपांत्य फेरीत भारताविरुद्ध फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. थायलंडने यजमान आणि गतविजेत्या बांगलादेशला पिछाडीवर टाकत पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. 

आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने भारताने आपली दुसरी फळी तपासून घेण्याची संधी साधली. या स्पर्धेत भारताने आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना संधी देत पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी तयार केले आहे. या योजनेनुसार कर्णधार हरमनप्रीत कौर सहापैकी केवळ तीन सामने खेळली. फिनिशरच्या भूमिकेसाठी भारताने किरण प्रभू नवगिरे व दयालन हेमलता यांना संधी दिली. दोघींना अद्याप फारशी छाप पाडता आली नाही. त्यामुळे उपांत्य सामन्यातही भारतीय संघ प्रयोग करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दीप्ती शर्मा, स्नेह राणा व राजेश्वरी गायकवाड या फिरकी त्रिकुटाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखले. भारताविरुद्ध नानापट कोंचारोएनकेई, नथाकन चेंथम व कर्णधार नारुमोल चाइवाइ यांच्यावर थायलंडची मदार असेल.

Open in App