Join us  

भारताचा युगांडावर एकतर्फी विजय, राज बावाचे शानदार शतक

१९ वर्षाखालील विश्वचषक, राज बावाचे शानदार शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 5:37 AM

Open in App

टारोबा (त्रिनिदाद) : उपांत्यपूर्व फेरीत आधीच प्रवेश निश्चित केलेल्या भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषकात आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात ३२६ धावांनी नवख्या युगांडाचा धुव्वा उडवला. भारताचा हा या विश्वचषकातला सलग तिसरा विजय ठरला. युगांडाविरुद्ध भारताने मिळवलेला हा विजय या स्पर्धेच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय ठरला.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने तब्बल ४०५ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून अंगकृष रघुवंशी  आणि राज बावा यांनी धडाकेबाज शतकी खेळी केली. तिसऱ्या गड्यासाठी या दोघांनी २०६ धावांची भागीदारी केली. रघुवंशीने १२० चेंडूत २२ चौकार आणि ४ षटकारांसह १४४ धावा केल्यात तर दुसऱ्या बाजूने राज बावाने १०८ चेंडूत नाबाद १६२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. युगांडाकडून पास्कल मुरुंगीने ७२ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. विशालकाय लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या युगांडा संघांची भारतीय गोलंदाजांसमोर दाणादाण उडाली. प्रत्युत्तरादाखल युगांडाच्या संघांने १९.४ षटकांत ७९ धावांवरच लोटांगण घातले. भारताकडून निशांत सिंधूने ४ तर राजवर्धन हंगरगेकरने २ बळी घेतले. या सामन्यात भारताच्या राज बावाने दोन विक्रम आपल्या नावे केले. १९ वर्षाखालील विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम राजने केला. सोबतच त्याने १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात मोठी नाबाद खेळी करण्याच्या विक्रमाला गवसणी घातली. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या जॅक रुडोल्फ आणि ऑस्ट्रेलियाच्या कॅमरून व्हाईट यांच्या नावावर हा विक्रम होता.

कोण आहे  राज अंगद बावा ?

नवी दिल्ली : १९ वर्षाच्या आतील विश्वचषकात सर्वात जास्त धावा करणारा राज बावा (१६२ धावा) हा जलदगती गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे आणि सध्या त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तो हिमाचल प्रदेशातील नहान येथील आहे. त्याचा जन्म १२ नोव्हेंबर २००२ रोजी झाला.  त्याचे वडीलदेखील क्रिकेट प्रशिक्षक आहेत. त्याचे आजोबा तरलोचन बावा यांनी हे १९४८ च्या ऑलिम्पिक्स हॉकी सुवर्णपदक विजेत्या संघाचे सदस्य होते. राज हा भारताचा यशस्वी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याला आदर्श मानतो. 

राज बावाचे वडील अंगद बावा हे युवराज सिंह याचे लहानपणीचे प्रशिक्षकदेखील आहेत. राज हा गोलंदाजी आणि फलंदाजीत किती निपूण आहे, हे त्याने स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांतच दाखवून दिले आहे. पहिल्या लढतीत त्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात १३ धावा केल्या. मात्र ६.४ षटकांतच ४ बळी घेतले. त्यासाठी त्याने ४७ धावा मोजल्या; तर आयर्लंडविरोधात त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४२ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात राज बावा याने युगांडाविरोधात खेळताना १०८ चेंडूंतच १६४ धावा केल्या       होत्या.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ
Open in App