Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत-श्रीलंका कसोटीच्या दुस-या दिवसाच्या खेळावर पावसाने फिरवले पाणी

भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशीही पावसाचाच खेळ चालू राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 15:18 IST

Open in App
ठळक मुद्देकसोटी डावात धाव न देता ३ बळी घेणारा सुरंगा लकमल केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे.

कोलकाता -  भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशीही पावसाचाच खेळ चालू राहिला. मैदानावर सर्वत्र पाणीच पाणी असल्याने पंचांनी दुस-या दिवसाचा खेळ रद्द केला. दुस-या दिवसअखेर भारताच्या पाच बाद 74 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पूजारा नाबाद (47) आणि वृद्धिमान सहा (6) धावांवर खेळत आहे. दुस-या दिवशी भारताला दोन झटके बसले. अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन स्वस्तात माघारी परतले. 

श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशीही भारताने खराब सुरुवात केली होती. 3 बाद 17 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला. कालच्या धावसंख्येत आणखी 13 धावांची भर घातल्यानंतर अजिंक्यला शानाकाने डिकवेलाकरवी झेलबाद केले. अजिंक्य रहाणे (4) धावांवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पूजाराला साथ देणा-या रविचंद्रन अश्विनने शानाकाच्या गोलंदाजीवर करुणारत्नेकडे झेल दिला. त्याने चार धावा केल्या.

50 धावात भारताचा निम्म संघ तंबूत परतला. खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत असल्याने इथे फलंदाजी करणे एक आव्हान आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी पाऊस आणि अंधूक सूर्यप्रकाशामुळे केवळ ११.५ षटकांचा खेळ शक्य झाला. त्यातही भारताची अवस्था ३ बाद १७ झाली. लकमलने सहा षटकांत एकही धाव न देता तिन्ही गडी बाद केले. 

साडेतीन तास विलंब...मैदानावर चिखल झाल्याने खेळ साडेतीन तास उशिरा सुरू करण्यात आला. लंकेचा कर्णधार दिनेश चांदीमलने ढगाळ वातावरण पाहून नाणेफेक जिंकताच क्षेत्ररक्षण घेतले. चार स्लिप आणि गली असे क्षेत्ररक्षण सजविणाºया लकमलने त्याचा निर्णय खरा ठरविला. ईडनच्या गवताळ खेळपट्टीचा पुरेपूर लाभ घेत पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला यष्टिरक्षक निरोशन डिकवेलाकडे झेल देण्यास बाध्य केले. मधल्या यष्टीवरून बाहेर जाणाºया चेंडूवर राहुल बाद झाला. यासोबतच सलग सात अर्धशतके ठोकण्याची त्याची कामगिरी खंडित झाली.

धाव न देता ३ बळी घेणारा लकमल दुसरा गोलंदाजवेगवान गोलंदाजीचे शानदार प्रदर्शन करताना श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने गुरुवारी भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ३ बळी घेतले. कसोटी डावात धाव न देता ३ बळी घेणारा तो केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये धाव न देता ३ बळी घेण्याचा पराक्रम आॅस्ट्रेलियाच्या रिची बेनोने भारताविरुद्ध दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर केला होता. त्या वेळी बेनोने ३.४ षटकांत धाव न देता ३ बळी घेत यजमान संघाला १३५धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी डिसेंबर २०१० मध्ये कँडी येथे विंडीजच्या गेलला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा तो श्रीलंकेचा एकमेव गोलंदाज आहे.

हे कसोटीपटू झाले पहिल्याच चेंडूवर बाद...-सलामीवीर लोकेश राहुल आज पहिल्याच चेंडूवर बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रि केट सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद होणारा लोकेश राहुल हा सहावा भारतीय सलामीवीर आहे. यापूर्वी सुनील गावसकर, वासिम जाफर, सुधीर नाईक, डब्ल्यू. व्ही. रमण आणि शिवसुंदर दास हे पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत.सुनील गावसकर तब्बल तीन वेळा पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. कोलकाता येथे पहिल्या चेंडूवर बाद होणारा लोकेश राहुल तिसरा सलामीवीर ठरला. यापूर्वी माजी सलामीवीर सुधीर नाईक आणि सुनील गावसकर ईडनवर पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. या दोन्ही सलामीवीरांना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी तंबूचा रस्ता दाखवला होता.१९८३ मध्ये वेस्ट इंडिजविरु द्ध कोलकाता येथे सुनील गावसकर मार्शलच्या गोलंदाजीवर बाद झाले होते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २४९ आणि दुसºया डावात अवघ्या ९० धावा केल्या. भारताने हा सामना ४६ धावांनी गमावला होता. गावसकर पाकिस्तानविरु द्ध इम्रान खान आणि इंग्लंडविरु द्ध अर्नाल्डच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर बाद झाले.इतर फलंदाजांमध्ये शिवसुंदर दास हा वेस्ट इंडिजच्या डिलोनचा बळी ठरला. तर जाफरला बांगलादेशच्या मूर्तझाने पहिल्या चेंडूवर तंबूत पाठवले. न्यूझीलंडविरु द्ध रमण पहिल्याच चेंडूवर बाद झाले.

टॅग्स :क्रिकेट