Join us

भारताचा वेगवान मारा दमदार, त्यांना ऑस्ट्रेलियात हरविणे कठीण, मार्नस लाबुशेनने व्यक्त केली चिंता

Border Gavaskar Trophy 2024: ‘भारताचे वेगवान गोलंदाज भेदक असल्याने ऑस्ट्रेलियात त्यांना हरविणे सोपे असणार नाही. उभय संघांदरम्यान कुठेही सामना असो, तो अत्यंत रोमहर्षक होतो. आगामी मालिकेबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.’ असे लाबुशेन म्हणाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 08:54 IST

Open in App

मुंबई  - भारताकडे वेगवान गोलंदाजांची शानदार फळी आहे. त्यांना बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियात हरविणे कठीण असेल, असे मत स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन याने व्यक्त केले आहे. भारत येथे २०१४-१५च्या मालिकेत १-२ ने पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांनी प्रत्येक द्विपक्षीय मालिकेत धूळ चारलेली आहे. भारताने २०१८-१९ला ऑस्ट्रेलियात २-१ असा मालिका विजय नोंदवला होता.

‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना लाबुशेन म्हणाला, ‘भारताचे वेगवान गोलंदाज भेदक असल्याने ऑस्ट्रेलियात त्यांना हरविणे सोपे असणार नाही. उभय संघांदरम्यान कुठेही सामना असो, तो अत्यंत रोमहर्षक होतो. आगामी मालिकेबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.’ 

चर्चेत सहभागी झालेला फिरकीपटू नाथन लियोन याने भारतीय खेळाडूंना सुपरस्टार संबोधले. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्यासोबत मैदानावर पुन्हा एकदा स्पर्धा करण्याची अपेक्षा व्यक्त केली. लियोन म्हणाला, ‘मी सर्वाेत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध खेळू इच्छितो. भारतीय संघात सुपरस्टार्सचा भरणा आहे. अश्विन आणि मी एकाच वेळी पदार्पण केले. माझ्या मनात त्याच्याविषयी फार आदर आहे. त्याच्याकडून बरेच काही शिकायला मिळते.’

 -  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होईल.  - भारत विश्व कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या सत्रात ६८.५२ गुणांसह अव्वल स्थानावर असून, ऑस्ट्रेलिया ६२.५० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. डब्ल्यूटीसी फायनल पुढील वर्षी ११ ते १५ जूनदरम्यान लॉर्ड्सवर खेळली जाईल.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया