सेंच्युरियन : मनीष पांड्ये (७९*) आणि महेंद्रसिंग धोनी (५२*) या दोघांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये डाव सावरत झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुस-या टी२० सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० षटकात ४ बाद १८८ धावांची आव्हानात्मक मजल मारली. ज्यूनिअर डाला याने दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवत भारतीय फलंदाजीला हादरे दिल्यानंतर मनीष - धोनी यांनी ९८ धावांची नाबाद भागीदारी केली.
सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर नाणे फेक जिंकून यजमानांनी भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. पहिले षटक निर्धाव खेळल्यानंतर दुस-या षटकातील पहिल्याच चेंडूवर डालाने रोहित शर्माला बाद केले. यानंतर शिखर धवन (२४) आणि अनुभवी सुरेश रैना (३१) यांनी ४४ धावांची भागीदारी करत भारताला सावरले. पण कर्णधार जेपी ड्युमिनीने धवनला बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात डालाने हुकमी विराट कोहलीला (१) बाद करुन भारताची अवस्था ३ बाद ४५ अशी केली.
अँडिले फेहलुकवायो याच्या गोलंदाजीवर स्थिरावलेला रैना बाद झाला. रैनाने २४ चेंडूत ५ चौकार लगावले. यावेळी भारताचा डाव ११व्या षटकात ४ बाद ९० धावा असा अडखळला होता आणि १५० धावांचा पल्ला कठिण दिसत होता. परंतु, मनीष - धोनी यांनी सावध सुरुवातीनंतर चौफेर फटकेबाजी करत यजमानांची धुलाई करुन भारताला आव्हानात्मक मजल मारुन दिली. मनिषने ४८ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७९, तर धोनीने २८ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५२ धावांचा तडाखा दिला.
संक्षिप्त धावफलक :
भारत : २० षटकात ४ बाद १८८ धावा. (मनिष पांड्ये नाबाद ७९, महेंद्रसिंग धोनी नाबाद ५२, सुरेश रैना ३१, शिखर धवन २४; ज्यूनिअर डाला २/२८, जेपी ड्युमिनी १/१३, अँडिले फेहलुकवायो १/१५)