लंडन : साउथम्पटनमध्ये पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेला भारतीय महिला क्रिकेट संघ शनिवारी लॉर्ड्सवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या लक्ष्याने खेळेल. हा विजय मिळवून भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात विश्वचषक स्पर्धेसाठी नवा अध्याय सुरू करील.
पहिल्या सामन्यात भारताने चार बळींनी विजय मिळवला होता. आता लॉर्ड्सवरील विजय भारताला केवळ मालिका जिंकून देणार नाही, तर मे महिन्यात श्रीलंका व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या त्रिकोणी मालिकेतील विजयाची मालिकाही पुढे नेईल. अनेक खेळाडू चांगली कामगिरी करीत असल्यामुळे अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
रेणुकासिंह ठाकूर आणि पूजा वस्त्राकर, या दोन प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनाने युवा गोलंदाज क्रांती गौडवर विश्वास दाखवला आणि तिने पहिल्याच सामन्यात दोन बळी घेत आपली निवड सार्थ ठरवली. स्मृती मानधनासोबत सलामीसाठी प्रतीका रावल प्रमुख दावेदार म्हणून पुढे आली आहे, तर शेफाली वर्माही आपल्या आक्रमक शैलीमुळे निवडीच्या समीकरणात आहे.