Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिलांचा ऐतिहासिक कसोटी विजय; इंग्लंडला तिसऱ्याच दिवशी विक्रमी ३४७ धावांनी लोळवून केला पराक्रम

उभय संघांत ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताचा १-२ असा पराभव झाला होता. कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने पराभवाचा हिशेब चुकता केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 05:50 IST

Open in App

नवी मुंबई : अनुभवी फिरकीपटू दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव महिला क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने  इंग्लंडवर तिसऱ्या दिवशीच ३४७ धावांनी मोठा विजय नोंदविला. यजमानांनी दिलेल्या डोंगराएवढ्या लक्ष्यासमोर पाहुण्या संघाने शरणागती पत्करली. दीप्तीच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडच्या फलंदाज सहज अडकल्या. यासोबत इतिहासात  पहिल्यांदाच इंग्लंडला भारतात कसोटीत पराभूत केले.

उभय संघांत ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताचा १-२ असा पराभव झाला होता. कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने पराभवाचा हिशेब चुकता केला. महिला क्रिकेटमधील धावांबाबत  हा सर्वांत मोठा विजय ठरला. सामन्यात ९ गडी बाद करणारी दीप्ती सामन्याची मानकरी ठरली.भारताने पहिल्या डावात ४२८ धावा केल्या होत्या. नवोदित शुभा सतीशने ६९ धावांची खेळी खेळली. दीप्तीने ६७ आणि यास्तिका भाटियाने ६६ धावांचे योगदान दिले. जेमिमा  रॉड्रिग्सने ६७ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात १३६ धावांत गुडघे टेकले.  दीप्तीने  ५ बळी घेतले. भारताने दुसरा डाव ६ गडी बाद १८६ धावांवर घोषित केला.  इंग्लंडला ४७९ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांचा संघ  १३१ धावांत गारद झाला. दीप्तीने ३२ धावांत ४ आणि पूजा वस्त्राकरने २३ धावांत ३ बळी घेतले. राजेश्वरी गायकवाडने २ तर रेणुका सिंग ठाकूरने १ बळी घेतला.

शुभा सतीश जखमीइंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात सर्वाधिक ६९ धावा काढणारी २४ वर्षांची फलंदाज शुभा सतीशच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटीत ती खेळू शकणार नाही.  

कसोटी क्रिकेट काय असते, हे खेळाडूंना कळले : मजुमदारबलाढ्य इंग्लंडला ३४७ धावांनी नमवून भारतीय महिला संघाने कसोटी क्रिकेट काय असते आणि ते का महत्त्वपूर्ण मानले जाते याचा प्रत्यय घेतल्याचे मत मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार यांनी व्यक्त केले. ‘कुठलाही सामना सोपा नसतो; पण आमच्या मुलींनी एकसंघपणे सराव आणि तयारी केली. त्याचे फळ म्हणून अडीच दिवसांत विजय साकार झाला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या आव्हानास सामोरे जाताना खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावेल,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संक्षिप्त धावफलकभारत पहिला डाव : ४२८, इंग्लंड पहिला डाव : १३६, भारत दुसरा डाव : ६ बाद १८६ वर घोषित. इंग्लंड दुसरा डाव : २७.३ षटकांत सर्वबाद १३१ (सोफिया डंकले १५, टॅमी ब्यूमॉंट १७, हीथर नाइट २१, डॅनी वॅट १२, सोफी एक्लेस्टोन १०, चार्ली डीन नाबाद २०, केट क्रॉस १६) गोलंदाजी : दीप्ती शर्मा ८-२-३२-४, पूजा वस्त्राकर ४-१-२३-३, राजेश्वरी गायकवाड ५.३-१-२०-२, रेणुकासिंग  ६-१-३०-१.

अनुभवातील उणीव प्रशिक्षकांनी भरून काढली : हरमनप्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करताना या प्रकारात पुरेसा अनुभव नव्हता. ही उणीव मुख्य कोच अमोल मजुमदार यांनी भरून काढली, असे मत ३४७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवून देणारी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने व्यक्त केले. उभय देशांत ३९ कसोटींत भारताचा हा सहावा विजय ठरला.

    महिला कसोटीत भारताचा हा सर्वांधिक धावांनी विजयाचा विक्रम ठरला. लंकेने १९९८ ला पाकिस्तानला ३०९ धावांनी नमविले होते.    भारताचा इंग्लंडवर स्थानिक मैदानावर १५ कसोटीत पहिला विजय ठरला. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड