- मतीन खान
(स्पोर्ट्स हेड- एव्हीपी लोकमत पत्रसमूह)
आयुष्यात कोणती गोष्ट जर थेट हृदयाला भिडते, तर ती आहे एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना! ही भावना अनुभवणे, पाहणे, ऐकणे आणि स्वीकारणे आपल्याला रोमांचित करते. कृतज्ञता ही माणसाला मिळालेली एक अमूल्य भावना आहे, जी इतर कोणत्याही प्रजातीला मिळालेली नाही. या विषयावर बोलणे महत्त्वाचे आहे. कारण, नुकताच एक असा प्रसंग पाहण्यात, ऐकण्यात आणि अनुभवण्यात आला, ज्याने या भावनेचे महत्त्व अधोरेखित केले.
भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच विश्वचषक जिंकला. या ऐतिहासिक क्षणी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना या दोघींनीही आपल्या आधीच्या पिढीतील खेळाडू- झूलन गोस्वामी, मिताली राज आणि अंजुम चोप्रा यांना कॅमेऱ्यासमोर हातातला विश्वचषक दिला. हे दृश्य विजयाचा आनंद द्विगुणित करणारे होते.
हे दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून आली. कारण, या नवीन विजेत्यांमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय आहे. त्यांनी त्या जुन्या खेळाडूंनाही चषकाला स्पर्श करण्याची संधी दिली. त्यांनीही हे स्वप्न पाहिले, पण त्या जिंकू शकल्या नाहीत. परंतु, त्या या सन्मानाच्या हकदार आहेत; कारण त्यांनी खूप संघर्ष सोसला आहे. द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करणे, डॉर्मेटरीमध्ये मुक्काम करणे, पैशांची कमतरता आणि खेळण्यासाठी कुटुंबासोबत केलेला संघर्ष, अशा अनेक अडचणींवर त्यांनी मात केली.
राष्ट्रपती भवनात जेमिमा रॉड्रिग्स हिने दिलेले भाषणही समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले. तिने आपल्या जुन्या पिढीच्या संघर्षाचे स्मरण करताना म्हटले की, ‘त्यांनी जे बीज पेरले, त्याचे पीक आम्ही आज कापत आहोत.’ हजारो लोक तिच्या या भाषणावर कौतुकाची थाप देत आहेत.
पुरुष संघ आणि कृतज्ञतेचा अभाव
याच संदर्भात आपण पुरुष क्रिकेट संघाबद्दलही बोलूया. तुम्ही कधी कोणत्याही पुरुष कर्णधाराच्या मुलाखतीत हे ऐकले आहे का की, ‘आम्ही कपिल देव यांच्या संघाचे आभारी आहोत, ज्यांनी पहिला विश्वचषक जिंकून भारतात क्रीडाक्रांती आणली आणि त्यानंतर क्रिकेट या देशात एक धर्म बनला.’ विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधाराने भाष्य करणाऱ्या सुनील गावसकर यांच्या हातात ट्रॉफी देऊन, ‘तुमच्यामुळे आणि तुमच्या त्यागामुळेच आम्ही हा दिवस पाहू शकलो,’ असे म्हटल्याचा कोणताही प्रसंग तुमच्या आठवणीत आहे का? असे कोणतेही दृश्य मी तरी पाहिलेले नाही.
दिग्गजांकडे दुर्लक्ष आणि ‘ज्ञान वाटप’ची टीका
सध्याची परिस्थिती अशी आहे की, जर एखाद्या जुन्या दिग्गज खेळाडूने वर्तमान खेळाडूंच्या कामगिरीवर थोडी टीका केली, तर त्यांना कॉमेंट्री पॅनेलमधून काढले जाते. जुन्या दिग्गजांकडून शिकले जात नाही; कारण ते मानधन/फी मागतात. भारतीय क्रिकेटमधील आतल्या गोटातील व्यक्तीने मला सांगितले की, सध्या खेळणारे खेळाडू जुन्या खेळाडूंना पाहताच बाजूला होतात (कन्नी काटतात) आणि त्यांच्याकडून शिकण्याऐवजी म्हणतात की, ‘अरे, ते पुन्हा ज्ञान वाटायला येत आहेत.’ या सगळ्या पार्श्वभूमीवर, महिला संघाने ज्या प्रकारे आपल्या जुन्या पिढीचे स्मरण केले आणि त्यांचा सन्मान केला, ते पाहून मला मुनव्वर राणा यांचा तो शेर आठवला...
खुद से चलकर नहीं ये तर्ज-ए-सुखन आया हैं, पांव दाबे हैं बुजर्गों के तो फन (कला) आया हैं।