Join us  

भारतीय संघाने केले इंग्लंडविरुद्ध सांघिक खेळाचे प्रदर्शन

खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 3:26 AM

Open in App

अयाज मेमन

पहिला कसोटी सामना मोठ्या फरकाने गमावल्यानंतर भारताने शानदार पुनरागमन करताना इंग्लंडविरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. या दमदार कामगिरीसह भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला. मालिकेत भारताने सांघिक खेळाचे जबरदस्त प्रदर्शन केले असून यानिमित्ताने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे केलेले विश्लेषण...

ऋषभ पंत (१० पैकी ९) :ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर अधिक कामगिरी सुधारली. परिस्थितीनुसार खेळ करत पंतने जबरदस्त आक्रमकता दाखवतानाच, सावध खेळही केला. कठीण खेळपट्टीवर भक्कम खेळ करत पंतने टीकाकारांना जोरदार उत्तर दिले.वॉशिंग्टन सुंदर (१० पैकी ८) :केवळ २१ वर्षांच्या सुंदरने कौतुकास्पद खेळ करताना ४ डावांमध्ये १८१ धावा केल्या. अखेरच्या सामन्यात दुर्दैवाने त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. गोलंदाजीत फारशी संधी मिळाली नसली, तरी एक चांगला अष्टपैलू म्हणून छाप पाडण्यासाठी सुंदरला गोलंदाजीत अधिक मेहनत घ्यावी लागेल.रोहित शर्मा (१० पैकी ८.५) :संपूर्ण मालिकेत जबरदस्त फलंदाज ठरला. दुसऱ्या कसोटीतील आव्हानात्मक खेळपट्टीवर १६६ धावांची खेळी तसेच दोन दिवसांत संपलेल्या दिवस-रात्र सामन्यातील ६१ धावांची खेळी लक्षवेधी ठरली. कसोटी क्रिकेटमध्येही रोहित आपले स्थान भक्कम करत आहे.चेतेश्वर पुजारा (१० पैकी ५) :मालिकेत पुजाराला साजेशी कमागिरी करता आली नाही. ६ डावांत १३३ धावा करताना केवळ एक अर्धशतक झळकावले. डावखुऱ्या लीचचा फिरकी मारा खेळताना अडखळला.विराट कोहली (१० पैकी ७) :दोन अर्धशतकांसह कोहलीने एकूण १७२ धावा केल्या. नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध १३९ धावा केल्यानंतर कोहलीला कोणत्याही प्रकारात शतक ठोकता आलेले नाही. कर्णधार म्हणून शानदार नेतृत्व केले. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर जबरदस्त पुनरागमन केले आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला.अजिंक्य रहाणे (१० पैकी ५) :रहाणेसाठी ही मालिका कमजोर ठरली. त्याने ६ डावांत केवळ ११२ धावा केल्या. दुसऱ्या कसोटीतील ६७ धावांच्या खेळीनंतर त्याची लय हरपली. स्लीपमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना त्याने लक्ष वेधले.शुभमान गिल (१० पैकी ५) :चेंडू बॅटवर येत असताना गिल शानदार खेळतो. ऑस्ट्रेलियात हे सर्वांनीच पाहिले. मात्र, फिरकी खेळपट्टीवर तो अडखळताना दिसला. अँडरसनच्या स्विंग माऱ्यापुढे चाचपडला. अनुभव वाढत जाईल, तसा गिल नक्कीच चांगला फलंदाज बनेल. शॉर्ट लेगमध्ये शानदार क्षेत्ररक्षण केले.इशांत शर्मा (१० पैकी ७) :वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत देणाऱ्या खेळपट्टीवर इशांतने प्रतिस्पर्धी फलंदाजांना कोंडीत पकडले. त्याने खूप मोठे यश मिळवताना या मालिकेत ३०० बळींचा टप्पाही पूर्ण केला.  मोहम्मद सिराज (१० पैकी ७) :इशांतप्रमाणेच सिराजला फार बळी मिळवण्यात यश आले नाही. पण असे असले तरी त्याने गोलंदाजी कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. गोलंदाजीतील वैविध्य शानदार होते.जसप्रीत बुमराह (१० पैकी ६) :गेल्या काही वर्षांत विकेट टेकर अशी ओळख मिळवणाऱ्या बुमराहला या मालिकेत लौकिकाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. मात्र, त्याने अचूकतेने मारा करताना धावांना वेसण घातली. त्याने दोन कसोटी सामने खेळताना फलंदाजांवर कायम दबाव राखला.कुलदीप यादव (१० पैकी ४.५) :केवळ दिवस-रात्र कसोटी खेळताना अश्विन-अक्षर यांना साथ दिली. दोन बळी घेत त्याने उपयुक्तता सिद्ध केली. संघ निवडीत मागे पडल्याने त्याला अखेरच्या कसोटीत संधी नाही मिळाली.शाहबाझ नदीम (१० पैकी २) :अक्षर दुखापतग्रस्त झाल्याने पहिल्या कसोटीत कुलदीपऐवजी  गोलंदाजीवर कोणतेही नियंत्रण नव्हते. सामन्यात ४ बळी घेताना २३३ धावांची खैरात केली. यानंतर संघातील स्थान गमावले.

आर. अश्विन (१० पैकी ९.५) : भारताचा सर्वात मौल्यवान खेळाडू यात शंका नाही. शानदार फिरकीच्या जोरावर त्याने इंग्लिश फलंदाजांवर सहज वर्चस्व राखले. फलंदाजांची मानसिकता ओळखून त्यानुसार मारा केला. दुसऱ्या कसोटीत शानदार शतक ठोकत उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून शिक्कामोर्तब केले.

अक्षर पटेल (१० पैकी ९ गुण) : तीन सामन्यांमध्ये मिळून २७ बळी घेतले. यामध्ये ४ वेळा अर्धा संघ बाद करत अक्षरने छाप पाडली. त्याच्या कसोटी कारकिर्दीची स्वप्नवत सुरुवात झाली आहे. वेग आणि अचूक टप्पा अक्षरची ताकद आहे. फलंदाजांना फारशी संधी न देणाऱ्या अक्षरने फलंदाजीतही चमक दाखवली.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड