सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीच्या मते भारत प्रथमच महिला टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवू शकतो. कारण भारतीय संघात १६ वर्षाची शेफाली वर्मासारख्या स्टार खेळाडूचा समावेश आहे. ली म्हणाला, ‘भारताचा हा संघ त्यांच्या पूर्वीच्या संघांच्या तुलनेत एकदम वेगळा आहे. आम्हाला नेहमीच कल्पना होती की भारतीय संघात जगातील काही सर्वोत्तम खेळाडू आहेत, पण आता हरमनप्रीत कौरकडे अशा खेळाडू आहेत ज्या दिग्गज खेळाडूंना सहकार्य करतात आणि त्या अपयशी ठरल्या तर योगदान देण्यास सक्षम आहेत.’ लीच्या मते प्रतिस्पर्धी संघाने विशेष प्रयत्न केले तरच भारताला अंतिम फेरी गाठण्यापासून रोखता येईल.
स्पर्धेत आतापर्यंत ४७, ४६, ३९ व २९ धावांच्या खेळी करणाऱ्या शेफालीची प्रशंसा करताना ली म्हणाला, ‘ही युवा खेळाडू उपांत्य फेरीत मोठी खेळी करेल. शेफालीने आघाडीच्या फळीत शानदार कामगिरी केली आहे. तिने भारतीय फलंदाजीमध्ये नवी ऊर्जा आणली आहे. तिचा खेळ बघताना आनंद होतो.’