मुंबई: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेतून कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्माआशिया चषक स्पर्धेत संघाचं नेतृत्त्व करेल. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनकडे असेल. वेगवान गोलंदाज खलील अहमद या संघातील नवा चेहरा आहे. 15 सप्टेंबरपासून यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होईल. 18 सप्टेंबरला भारताचा स्पर्धेतील पहिला सामना होईल.
विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यानं या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्त्व करेल. तर शिखर धवन उपकर्णधार असेल. भारतीय फलंदाजीची जबाबदारी या दोघांसह के. एल. राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, एम. एस. धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या यांच्यावर असेल. भारतीय गोलंदाजीची धुरा फिरकीपटू कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, अक्षर पटेल, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर आणि खलील अहमद यांच्या खांद्यावर असेल. 
विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्यानं त्याला विश्रांती देण्यात आल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे. कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय अशा तिन्ही प्रकारांमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या फिटनेसची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला, असंदेखील बीसीसीआयनं पत्रकार परिषदेत सांगितलं. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघ चौथा कसोटी सामना खेळत असून मालिकेतील आणखी एक कसोटी सामना शिल्लक आहे.