- अयाझ मेमन
पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळविला. मालिकेत शानदार सुरुवात झाली. हा सामना रंगतदार होईल, अशी आशा होती; पण तसे झाले नाही. त्यामुळे थोडी निराशा झाली. जिंकलो हे चांगले झाले; पण भारतावर थोडा दबाव असता आणि लक्ष्य मोठे असते तर इतर फलंदाजांना खेळण्याची संधी मिळाली असती. कारण, पुढे विश्वचषक आहे. या विश्वचषकापूर्वी भारतीय संघातील अधिकाधिक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, असे वाटते.
आजच्या सामन्यात भारताने उत्कृष्ट गोलंदाजी केली. मोहम्मद शमीने नव्या चेंडूसह सुरुवात करताना भारताला ‘ब्रेक थ्रू’ मिळवून दिला. त्यानंतर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी शानदार योगदान दिले. हे दोघेही आजच्या सामन्याचे हीरो ठरले. मनगटाच्या जोरावर चेंडू फिरविणारे हे दोघेही यशस्वी झाले. आता तर असे वाटायला लागले की, या दोघांनी एकदिवसीय संघात असायला हवे. त्यानंतर शिखर धवनला ‘मार्क्स’ द्यावे लागतील. संघाला विजयी शेवट करण्यात त्याचा मोठा वाटा राहिला. आजच्या खेळीने त्याचे मनोबल उंचावले असेल. गेल्या काही सामन्यांपासून तो संघर्ष करीत होता. यात आज यशस्वी झाला.
शिखर आणि रोहित शर्मा यांच्यातील ताळमेळ जुळणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. विश्वचषकात या जोडीने सुरुवात करावी असे वाटते. कारण, हे दोघेही मैदानावर राहिले तर प्रतिस्पर्ध्यांवर जबरदस्त दबाव वाढतो. त्यामुळे शिखर धवनचे फॉर्ममध्ये परतणे आवश्यक आहे. नाहीतर रोहितला एखाद्या दुसऱ्या सलामीवीरासोबत ताळमेळ जुळवावा लागेल. २००९ नंतर न्यूझीलंमध्ये भारताने हा पहिलाच विजय नोंदविला आहे.
आगामी विश्वचषकासाठी सात-आठ खेळाडूंची जागा पक्की झाली आहे. अंबाती रायडू, केदार जाधव अशा खेळाडूंची जागा मात्र निश्चित नाही. हार्दिक आणि राहुल हे सध्या संघाबाहेर आहेत. त्याच्याबाबतचा निर्णय लवकर लागल्यास त्यांचा विचार होईल; पण त्यांनाही संघात पुनरागमनासाठी स्वत:ला सिद्ध करावे लागेल. या मालिकेत तर त्यांना संधी मिळणार नाही; मात्र घरच्या मैदानावर संधी मिळू शकते. या मालिकेत प्रत्येक सामना जिंकत पुढे जायला हवे. मालिकेतील ही सर्वांत चांगली सुरुवात आहे.
दुसरीकडे, न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सनने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीस उपयुक्त अशा खेळपट्टीपवर फलंदाजीचा निर्णयही घेतला. मात्र, त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही, याचे आश्चर्य वाटते. कारण, भारतीय फलंदाजांनी ज्या प्रकारे धावा सहज घेतल्या तशाही त्यांना घेता आल्या नाहीत. भारतीय गोलंदाजीला दाद द्यावी लागेल. मोहम्मद शमी, चहल आणि यादव या त्रिकुटाने शानदार प्रदर्शन केले. विल्यम्सन याला सोडले तर इतर फलंदाज अपयशी ठरले.
अशा खेळपट्टीवर दीडशे धावसंख्या उभारली तर तुम्हाला जिंकणे कठीण असते. भारतीय संघाचा विचार करता आज क्षेत्ररक्षणात काही चुका झाला. तीन-चार झेल सोडले गेले. त्यामुळे पुढील सामन्यात भारतीय संघाला क्षेत्ररक्षणावर भर द्यावा लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण अतिआत्मविश्वासाने जडता कामा नये. प्रत्येक सामन्यावर नजर ठेवत मालिकेत पुढे जायला हवे.
( संपादकीय सल्लागार)