Join us  

IPLनंतर टीम इंडियाचे होणार दोन गट; BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

टीम इंडियाचे दोन गट होणार; बीसीसीआयकडून प्लानची आखणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 7:37 PM

Open in App

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगनंतर भारतीय खेळाडूंना आराम करायला फारसा वेळ मिळणार नाही. जून, जुलैमध्ये टीम इंडियाला दोन महत्त्वाच्या मालिका खेळायच्या आहेत. टीम इंडियाला इंग्लंड दौरा करायचा आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येईल. लागोपाठच्या दोन मोठ्या मालिकांसाठी बीसीसीआयनं खास योजना आखली आहे.

चेतन शर्मांच्या नेतृत्त्वाखालील निवड समिती दोन वेगवेगळे संघ तयार करणार आहेत. गेल्या वर्षी भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्याचवेळी भारताचा दुसरा संघ श्रीलंकेला गेला होता. या संघात तुलनेनं नवखे खेळाडू होते. आताही बीसीसीआय अशाच प्रकारे दोन संघ तयार करणार असल्याचं वृत्त क्रिकइन्फोनं दिलं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ जूनमध्ये भारतात येईल. ९ ते १९ जून दरम्यान भारत आफ्रिकेविरुद्ध पाच टी-२० सामने खेळेल. दिल्ली, कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरूत सामने होतील. या मालिकेत अनेक नवोदितांना संधी मिळेल. अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समन्वय राखून संघ निवडला जाईल. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करमाऱ्या तिलक वर्मा, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान यांना आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

अनुनभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाचं नेतृत्त्व शिखर धवनकडे दिलं जाऊ शकतं. या संघात काही अनुभवी खेळाडू असतील. हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार यांची नावं आघाडीवर आहेत. सूर्यकुमार यादवचा फिटनेस योग्य असल्यास त्याचाही विचार होईल. तर दुसरीकडे इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा यांची निवड पक्की मानली जात आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२भारतीय क्रिकेट संघ
Open in App