अनेक देशी, विदेशी क्रिकेटपटूंना खेळण्यासाठी बोलावून, एखाद्या बड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीगसारखी हवा करून काश्मीरमध्ये सुरू झालेली इंडियन हेवन प्रीमियर लीग (IHPL) सध्या वादात सापडली आहे. या स्पर्धेचे आयोजन अचानक गायब झाल्याने स्पर्धेत सहभागी झालेले क्रिकेटपटू आणि पंचांवर मोठी नामुष्की ओढवली आहेत. आयोजकांनी खेळाडू आणि पंचांचं मानधन तसेच हॉटेलचं बिल दिलं नसल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हॉटेलचं बिल न भरलं गेल्याने हॉटेल व्यवस्थापनाने खेळाडूंना हॉटेलबाहेर येण्यापासून रोखल्याचीही माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार इंडियन हेवन प्रीमियर लीग नावाची ही लीग श्रीनगरमधील बख्शी स्टेडियम येथे २५ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. या लीगमध्ये ८ संघ आणि ७० खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंमध्ये ख्रिस गेल, मार्टिन गप्टिल, थिसारा परेरा, जेसी रायडर यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय तर प्रवीण कुमार, परवेझ रसूल यांच्यासारखे भारतीय क्रिकेटपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेचा आंतिम सामना हा ८ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार होता. मात्र तत्पूर्वीच आयोजक फरार झाल्याने खळबळ उडाली आहे.
ही स्पर्धा एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखी वाटावी यासाठी पंच आणि तांत्रिक अधिकाऱ्यांना आयोजकांनी इंग्लंडहून पाचारण केले होते. एवढंच नाही तर जम्मू काश्मीर स्पोर्ट्स कौन्सिलनेसुद्धा याला अधिकृत पाठिंबा दिला होता. तसेच सोईसुविधा दिल्या होत्या.
मात्र सोमवारी सकाळी श्रीनगरमधील एका हॉटेलने बिल न मिळाल्याने खेळाडूंना हॉटेलमधून बाहेर पडण्यापासून रोखले. तेव्हा खेळाडूंनी सोशल मीडियावरून मदत मागितली आणि या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. दरम्यान, या स्पर्धेचे आयोजक काहीही न सांगता काश्मीरमधून पसार झाले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या प्रकरणी कुठल्याही सरकारी विभागाने अद्याप टिप्पणी केलेली नाही.