Join us  

Ravi Shastri reaction on Shahid Afridi: "वन डे क्रिकेटच्या ओव्हर्स कमी करा.."; शाहिद आफ्रिदीच्या विधानावर रवी शास्त्री काय म्हणाले पाहा

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत येतो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 6:14 PM

Open in App

Ravi Shastri reaction on Shahid Afridi: टी२० क्रिकेटचा अतिरेक होत असल्याने आता ५० षटकांचे वन डे क्रिकेट सामने कंटाळवाणे वाटू लागल्याची चर्चा सर्वत्र रंगलेली दिसते. वन डे सामन्यांना प्रेक्षक फारशी गर्दी करतानाही दिसत नाहीत. अलीकडेच, इंग्लंडच्या बेन स्टोक्सने वन-डेतून निवृत्ती घेतली. अशातच पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने वन डे सामन्यांमध्ये एक महत्त्वाचा बदल सुचवला आहे. या क्रिकेट सामन्यांची षटकं कमी करून दोन्ही डावात ४०-४० षटकं खेळवली जावीत, असं मत त्याने व्यक्त केले आहे.

शाहिद आफ्रिदीने असे मत मांडले असतानाच या वादात आता टीम इंडियाचे (Team India) माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपलं मत मांडलं. वन-डे क्रिकेटची लांबी लहान करून त्याचं संवर्धन करणं शक्य असेल तर तसं नक्कीच व्हायला हवं, असं त्यांनी म्हटले. कारण या आधी वन डे क्रिकेट ६० षटकांवरून ५० षटकांपर्यंत कमी करण्यात आले होते.

रवी शास्त्री नक्की काय म्हणाले...

रवी शास्त्री भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेत कॉमेंट्री करत आहेत. यावेळी त्यांनी या विषयावर चर्चा केली. रवी शास्त्री म्हणाले, "वन डे सामना लहान करण्यात काहीच चुकीचे नाही. आधी ६० षटकांचा सामना असायचा. आम्ही १९८३ चा विश्वचषक जिंकला तेव्हा ६० षटकांचा सामना खेळला जायचा. नंतर कालांतराने तो ५० षटकांचा सामना करण्यात आला. कारण तेव्हा लोकांना २० ते ४० षटकांच्या मधला खेळ हा कंटाळवाणा वाटायचा. मग आता जर लोकांना मजा येत नसेल, तर ५० षटकांचा हा खेळ ४० षटकांचा करायला काहीच हरकत नसावी."

शाहिद आफ्रिदीचे मत काय?

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही आधी समा टीव्हीशी झालेल्या मुलाखतीत या संदर्भात भूमिका स्पष्ट केली होती. शाहिद आफ्रिदी म्हणाला होता, "वन डे क्रिकेट हे आता हळूहळू कंटाळवाणे होऊ लागले आहे. दिवसेंदिवस या खेळातील रस कमी होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अशा वेळी परिस्थिती पाहून मला असं सुचवावंसं वाटतं की वन डे क्रिकेटची लांबी थोडी कमी झाली पाहिजे. हे सामने आपण ५० षटकांऐवजी ४० षटकांचे खेळवले पाहिजेत, जेणेकरून याचा निकाल लवकर लागेल आणि सामन्यातील रूची कायम राहिल."

टॅग्स :शाहिद अफ्रिदीरवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघपाकिस्तान
Open in App