नवी दिल्ली : भारताच्या अव्वल क्रिकेटपटूंसाठी चार टप्प्यांचा सराव कार्यक्रम तयार करण्यात येत असून शिबिराला सुरुवात झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांच्या सरावानंतर खेळाडू पूर्ण फिटनेस मिळतील, अशी माहिता भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी दिली आहे.
श्रीधर २०१४ पासून भारतीय संघाचा अविभाज्य घटक आहेत. कोविड-१९ महामारीमुळे ठप्प असलेला खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्यस्त कार्यक्रमासाठी सज्ज असतील, असेही ते म्हणाले.
श्रीधर यांनी सांगितले की,‘ज्यावेळी आम्हाला बीसीसीआयकडून निश्चित तारीख (राष्ट्रीय शिबिर सुरू करण्यासाठी) मिळेल त्यावेळी आम्हाला प्राथमिक स्तरापासून काम करण्यास सुरुवात करता येईल.
सर्वांत मोठे आव्हान योग्य पद्धतीने आगेकूच करणे आहे. कारण खेळाडू १४-१५ आठवड्यानंतर खेळताना रोमांचित होण्याची शक्यता आहे.’
श्रीधर यांनी कार्यक्रम व्यवस्थापनावर भर देताना इशारा दिला की सुरुवातीलाच गरजेपेक्षा अधिक सराव केला तर दुखापतग्रस्त होण्याची भीती राहील. सुरुवातीला आम्ही खेळाडूंना हलका व्यायाम करण्याचा सल्ला देऊ आणि त्यानंतर टप्प्या-टप्प्याने त्याचा स्तर उंचवावा लागेल. पहिल्या टप्प्यात हळुवारपणे हलका सराव करावा लागेल. दुसऱ्या टप्प्यात गती कमी ठेवत सराव वाढवावा लागेल. त्यानंतर गती व सराव दोन्हींचा स्तर वाढवावा लागेल.’
ते पुढे म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात वेगवान गोलंदाज १/२ किंवा
१/४ रनअपसह कमी वेगाने
गोलंदाजी करतील. क्षेत्ररक्षक
१० मीटर अंतरावरूनच थ्रो करतील आणि त्याचप्रमाणे फलंदाज पाच किंवा सहा मिनिटे सरावाने सुरुवात करतील.’
४९ वर्षीय हे कोच म्हणाले, ‘कसोटी सामन्याचा दर्जा गाठण्यासाठी खेळाडूंना किमान सहा आठवड्यांचा अवधी लागेल. वेगवेगळ्या खेळाडूंना सामन्यासाठी सज्ज होण्यासाठी वेगवेगळा वेळ लागेल.’ (वृत्तसंस्था)