भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा असलेल्या ‘रणजी’मध्ये त्रिशतकी खेळी करणाऱ्या धडाकेबाज फलंदाजाने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच निवृत्तीनंतर त्याने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. या क्रिकेटपटूचं नाव प्रियांक पांचाल असून, त्याने मे महिन्यात क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती स्वीकारली होती. दरम्यान, गुजरात आणि भारत अ संघाचं नेतृत्व करणाऱ्या ३५ वर्षीय प्रियांक पांचालने आता सोशल मीडियावरून अनेक दावे केले आहेत.
प्रियांक पांचालने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी केलेली आहे. त्याने २०१६ साली पंजाबविरुद्धच्या रणजी सामन्यात गुजरातकडून खेळताना ४६० चेंडूत नाबाद ३१४ धावा फटकावल्या होत्या. प्रियांक पांचालने एकूण १२७ प्रथमश्रेणी सामन्यांमधून ४५.१८ च्या सरासरीने ८ हजार ८५६ धावा फटकावल्या होत्या. त्यात २९ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. आता प्रियांकने क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करण्यामागचं कारण सांगितलं आहे.
प्रियांक पांचालने सांगितले की, प्रत्येक क्रिकेटपटूच्या दोन कारकिर्दी असतात. पहिली म्हणजे देशाकडून खेळण्याची संधी असलेली आणि देशाकडून खेळण्यासाठी संधी नसलेलं. मी आता भारतासाठी खेळू शकत नाही याची जाणीव झाल्यावर दुसरं करिअर सुरू करण्याचा आणि त्याची चांगली सुरुवात करणं हीच बाब समजुतदारपणाची होती. शेवटी जीवनामध्ये क्रिकेटशिवायही खूप काही आहे, असे तो म्हणाला.
प्रियांक पांचालच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने १२७ प्रथमश्रेणी सामन्यांमधून ४५.१८ च्या सरासरीने आणि २९ शतके व ३४ अर्धशतकांच्या मदतीने ८ हजार ८५६ धावा फटकावल्या होत्या. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये ९७ सामन्यांमध्ये ४०.८० च्या सरासरीने ३ हजार ६७२ धावा काढल्या होत्या. त्यात ८ शतके आणि २१ अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय ५९ टी-२० सामन्यांमध्ये २८.७१ च्या सरासरीने १ हजार ५२२ धावा काढल्या.