Join us

संघात आमचा होतोय छळ; रहाणे-पुजाराने केली तक्रार

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी चक्क बीसीसीआय सचिव जय शाह यांना फोन करुन आपला छळ होत असल्याची तक्रार केली होती, हा मोठा खुलासा बुधवारी झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 09:46 IST

Open in App

नवी दिल्ली: ‘विराट कोहलीने टी २० क्रिकेटमधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यामागील कारणांबाबत चर्चा सुरू असतानाच नवी माहिती पुढे आली आहे. भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी चक्क बीसीसीआय सचिव जय शाह यांना फोन करुन आपला छळ होत असल्याची तक्रार केली होती, हा मोठा खुलासा बुधवारी झाला.

वृत्तानुसार जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. भारतीय संघ १७० धावांवर बाद झाला. त्यानंतर संघाने जेतेपदावरील पकड गमावली. पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेवर ड्रेसिंग रुममध्ये जाऊन आरडाओरड केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे संघामध्ये फूट पडली आणि यातूनच मोठा वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुजाराला कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात अपयश येत होते.  कसोटी संघाचा उपकर्णधार राहणेला देखील चांगली कामगिरी करता आली नाही.

पुजारा आणि रहाणेने जय शाह यांना फोन करुन घडलेला प्रसंग सांगितला. बीसीसीआयने याप्रकरणात लक्ष घातले आणि संघातील इतर खेळाडूंकडून याबद्दल माहिती मागविली. संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना विराटच्या नेतृत्वशैलीवर आक्षेप असल्याची माहिती आहे. बीसीसीआयने सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. विराटला याची कुणकुण लागताच त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अतिरिक्त ओझे कमी करण्याचे कारण देत टी-२० प्रकाराचे नेतृत्व सोडण्याची तडकाफडकी घोषणा केली. टी-२० विश्वचषकानंतर विराटकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्व देखील काढून घेतले जाऊ शकते,असे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :अजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजाराजय शाहविराट कोहली
Open in App