Join us  

India vs South Africa 2nd ODI: "म्हणून आम्ही हारलो"; कर्णधार केएल राहुलने दिली प्रामाणिक कबुली

टीम इंडियाचं नक्की काय चुकलं, याबद्दल कर्णधार केएल राहुलने प्रतिक्रिया दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 9:11 AM

Open in App

India vs South Africa 2nd ODI: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी पाठोपाठ वन डे मालिकाही गमावली. दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा सात गडी राखून यजमानांनी पराभव केला. भारताने ऋषभ पंत (८५) आणि केएल राहुल (५५) यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताला २८७ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण आफ्रिकन सलामीवीर क्विंटन डी कॉक (७८) आणि जानेमन मलान (९१) या दोघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेने ७ गडी आणि ११ चेंडू राखून सामन्यासह मलिका खिशात घातली. सामन्यानंतर बोलताना कर्णधार केएल राहुलने भारताच्या नक्की काय चुका झाल्या याबद्दल प्रतिक्रिया दिली.

"दक्षिण आफ्रिका त्यांच्या घरच्या मैदानावर उत्तम क्रिकेट खेळत आहे. त्यांच्याही काही चुका होत आहेत पण त्याकडे आम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे. हा पराभव म्हणजे टीम इंडियाला मिळालेला धडा आहे. आमच्या संघाला विजय मिळवणं नेहमीच आवडतं पण जेव्हा आम्ही हारतो त्यावेळी त्यातून आम्ही शिकतो. दुसऱ्या वन डे साठी असलेली खेळपट्टी भारतातल्या खेळपट्ट्यांसारखी होती. त्यामुळे आफ्रिकन फलंदाज आव्हान पार करणार नाहीत असं मला वाटलं होतं पण त्यांच्या फलंदाजांचे कौतुक केलं पाहिजे. त्यांनी उत्तम फलंदाजी केली", अशी प्रामाणिक कबुली राहुलने दिली.

"भारतीय फलंदाजीबाबत बोलायचं झालं तर ऋषभ पंतने खूप चांगली फलंदाजी केली. त्याने स्वत:ची बलस्थाने लक्षात घेऊन फटकेबाजी केली. शार्दुलने पुन्हा एकदा दाखवून दिलं की तो तळाच्या फळीत खेळून चांगल्या धावा जमवू शकतो. गोलंदाजीतही जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल दोघांनी उत्तम गोलंदाजी केली. दुसऱ्या वन डे मध्ये या साऱ्या सकारात्मक गोष्टी होत्या. आमच्या संघाला आव्हानांचा सामना करायला आवडतो. आम्ही पहिल्या दोन सामन्यात कमी पडलो हे आम्हाला मान्यच आहे. पण आम्ही नक्कीच तिसरा सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावू", असा निर्धार भारतीय कर्णधाराने व्यक्त केला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुलरिषभ पंतविराट कोहली
Open in App