Indian Army Jawans celebration India won Asia Cup 2025 IND vs PAK: टीम इंडियाने आशिया चषक २०२५च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना साहिबजादा फरहान याच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने १९.१ षटकात १४६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना तिलक वर्माचे नाबाद अर्धशतक आणि शिवम दुबे व संजू सॅमसन यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने दोन चेंडू राखून हा सामना जिंकला. भारताने पाकिस्तानला पराभूत करत विक्रमी कामगिरी केली. या विजयानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
लष्करी जवानांसोबत काश्मीरी नागरिकांचा जल्लोष
भारतीय संघाने शेवटच्या षटकांत पाकिस्तानवर विजय मिळवला. भारताने विजय मिळवताच संपूर्ण भारतात जल्लोष पाहायला मिळाला. जम्मू काश्मीरच्या पूँछ सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी काश्मीरमधील स्थानिकांच्या सोबत भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. भारतीय जवान आणि स्थानिक नाचताना दिसले. तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यावेळी लष्कराचे जवान आणि स्थानिक नागरिक यांनी एकमेकांची गळाभेट घेत भारताच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
याशिवाय, भारतीय संघाने विजयश्री खेचून आणत पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पोस्ट केला. "खेळाच्या मैदानावर 'ऑपरेशन सिंदूर'. निकाल सारखाच राहिला - भारत जिंकला! आपल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
भारताने जिंकला आशिया चषक
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजीला बोलावले. सलामीवीर फरहान (५७) आणि फखर जमान (४६) या दोघांनी ८४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर सैम आयुबने १४ धावा केल्या. पाकिस्तानची धावसंख्या १ बाद ११३ असताना अयुब बाद झाला. त्यानंतर एकालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. भारताकडून कुलदीप यादवने चार तर बुमराह, वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले. १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा (५), सूर्यकुमार यादव (१) आणि शुबमन गिल (१२) स्वस्तात बाद झाले. संजू सॅमसनने तिलक वर्माच्या साथीने भागीदारी केली पण तो २४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्मा (नाबाद ५३) आणि शिवम दुबे (३३) यांच्या भागीदारीने भारताला विजयासमीप आणले. अखेर रिंकू सिंगने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.पाकिस्तानच्या फहीम अश्रफने तीन तर शाहीन आफ्रिदी आणि अबरार अहमद यांनी एक-एक बळी घेतला.