जयपूर, आयपीएल 2019 : रिषभ पंत नामक वादळासमोर राजस्थान रॉयल्स संघाचा पालापाचोळा झाला... 192 धावांचे लक्ष्य उभे करूनही राजस्थानला सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून 6 विकेटने हार पत्करावी लागली. पंतने 36 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 78 धावांची खेळी केली. पंतच्या या खेळीनंतर वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघावर पुन्हा चर्चा सुरू झाली. इंग्लंड येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी बीसीसीआयनं निवडलेल्या 15 सदस्यीय संघात पंतच्या जागी दिनेश कार्तिकला प्राधान्य देण्यात आले. निवड समितीच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पंतला वर्ल्ड कप संघात स्थान न देऊन भारतीय संघाने मोठी चूक केल्याचा दावा, पाँटिंगने केला.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पंतने 27 चेंडूंत 78 धावांची फटकेबाजी केली होती. त्यानंतर त्याला सातत्या राखता आले नाही. पाँटिंग म्हणाला,''रिषभ पंतसारखा स्फोटक फलंदाज वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघात हवा होता. आजच्या सामन्यात त्याच्या आक्रमक फलंदाजीचा आस्वाद घेतला. एकदा लय सापडली की तो आतषबाजीच करतो,'' असे पाँटिंग म्हणाला.