नागपूर - सलामीवीर स्मृती मानधनाच्या धडाकेबाज ८६ धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय लढतीत शुक्रवारी इंग्लंडचा एका गड्याने पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली आहे.
जामठा स्टेडियमवर झालेल्या लढतीत इंग्लंडने दिलेले २०८ धावांचे लक्ष्य भारताने पाच चेंडू शिल्लक राखून गाठले. स्मृतीने पाच चौकार व चार षटकारांसह ८६ धावा ठोकल्या.
स्मृतीने हरमनप्रीत कौर(२१) आणि दीप्ती शर्मा(२४) यांच्यासोबत मोलाची भागीदारी केली. त्याआधी, पुनम यादवने ३० धावात चार आणि एकता बिश्तने ४९ धावात तीन गडी बाद करीत इंग्लंड संघाला ४९.३ षटकांत २०७ धावांवर बाद केले. इंग्लंडकडून डॅनियली वॅट(२७) आणि टॅमी ब्युमोंट(३७) या सलामीच्या जोडीने ७१ धावांची भागीदारी केली. विल्सनने ४५ धावा ठोकून संघाच्या २०० धावा फळ्यावर लावल्या. (वृत्तसंस्था)
बिश्तची निर्णायक झुंज
देविका वैद्य (१५) व स्मृती मानधना (८६) यांनी शानदार सुरुवात केली. मात्र, डॅनियली हेजलने लागोठाच्या षटकांत देविका व कर्णधार मिताली राज यांना बाद करत भारताची २ बाद ४१ धावा अशी अवस्था केली. हरमनप्रीत कौर (२१), दीप्ती शर्मा (२४) यांनी चांगले योगदान दिले दीप्ती मोक्याच्यावेळी बाद झाली. सुषमा वर्मा (३), वेदा कृष्णमूर्ती (८) व झुलन गोस्वामी (२) झटपट बाद होताच सामनो इंग्लंडकडे झुकला. परंतु, एकता बिश्तने १२ चेंडूत १२ धावा ठोकून भारताच्या विजयावर शिक्का मारला.