मुंबई : ‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुरु असलेल्या दुसºया कसोटी सामन्यात पुनरागमन करण्यासाठी भारताला ५००हून अधिक धावा फटकावण्याची आवश्यकता आहे,’ असे मत विदर्भाच्या ऐतिहासिक रणजी जेतेपदामध्ये मोलाचे योगदान देणारा अनुभवी फलंदाज वासिम जाफर याने व्यक्त केले.
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जाफर म्हणाला, ‘आपण यजमानांना बाद केले आहे, पण आता भारताला खूप चांगली फलंदाजी करावी लागेल. जर पहिल्या डावात ५००हून अधिक धावा करण्यात यश आले, तर मालिकेत बरोबरी साधण्यात आपल्याला यश येईल, अशी मला खात्री आहे.’ त्याचप्रमाणे, ‘सध्याच्या संघातील बहुतेक खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेत खेळण्याचा अनुभव असून हे खेळाडू आॅस्टेÑलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्येही खेळले आहेत.
त्यांना माहितेय की काय करायचे आहे. त्यांना केवळ खेळपट्टीवर वेळ घालवण्याची गरज आहे. ज्यावेळी ते लय पकडतील, तेव्हा खेळपट्टी भारतीय फलंदाजीसाठी पोषक बनेल.’
संघ निवडीबाबत जाफरने कर्णधार विराट कोहलीची पाठराखण केली. त्याने म्हटले की, ‘कोहलीला माहित आहे की तो काय करतोय. तुम्हाला त्याच्या निर्णयाचा सम्मान करावा लागेल. कोहलीला अधिक प्रश्न विचारण्यासाठी मालिका संपण्याची प्रतीक्षा करायला हवी.’