Team India Set Record Second Highest Total T20 World Cup : अभिषेक शर्मासह हार्दिक पांड्याच्या कडक अर्धशतकासह कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध निर्धारित २० षटकात ४ बाद २५६ धावा केल्या आहेत. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा श्रीलंकेच्या नावे आहे. हा वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात बचावला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
आघाडीच्या फळीत अभिषेक शर्माच्या अर्धशतकासह प्रत्येकाने दिलं उपयुक्त योगदान
झिम्बाब्वेच्या संघाचा कर्णधार सिकंदर रझा याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी फोल ठरवला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं संघाला चांगली सुरुवात करून दिली. संजू १५ चेंडूत २४ धावांची उपयुक्त खेळी करून परतल्यावर अभिषेक शर्मानं ३० चेंडूत ५५ धावांची खेळी साकारली. ईशान किशनच्या बॅटमधूनही २४ चेडूत ३८ धावांची खेळी आली. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही १३ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले.
अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या अन् तिलक वर्माचा जलवा
अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मानं मोठा धमाका केला. पाचव्या विकेटसाठी दोघांनी फक्त ३१ चेंडूत ८४ धावांची भागीदारी रचली. या दमदार भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २५६ धावा लावल्या. हार्दिक पांड्याने २३ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ५० धावांची खेळी केली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्मानं ३ चौकारआणि ४ षटकारांच्या मदतीने फक्त १६ चेंडूत ४४ धावा कुटल्या.
टी२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड
२६०/६ श्रीलंका विरुद्ध केनिया जोहन्सबर्ग, २००७
२५६/४ भारत विरुद्ध झिम्बाब्वे चेन्नई, २०२६ *
२५४/६ वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे वानखेडे २०२६
२३५/५ आयर्लंड विरुद्ध ओमान, कोलंबो, २०२६
२३०/८ इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका वानखेडे, २०१६
२२९/४ दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड वानखेडे, २०१६