Join us

India vs West Indies : लोकेश, मयांक की पृथ्वी, संधी कुणाला द्यायची? विराटसमोर प्रश्न

India vs West Indies: राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर गुरुवारपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 11:28 IST

Open in App

राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर गुरुवारपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघात सलामीला कोणाला संधी द्यावी, या प्रश्नाने कर्णधार विराट कोहलीची चिंता वाढवली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर केलेल्या भारतीय संघात लोकेश राहुल, पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या तीन सलामीवीरांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, यापैकी कोणाला संधी मिळेल हे अद्याप ठरलेले नाही.

राजकोट कसोटीसाठी भारतीय संघाने बुधवारी कसून सराव केला. लोकेश राहुलला इंग्लंड दौऱ्यात पाचही सामन्यांत संधी देण्यात आली, परंतु त्याला शेवटच्या कसोटीत शतकी खेळी करता आली. मात्र उर्वरित 9 डावांमध्ये त्याला मिळून 150 धावाच करता आल्या. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळेलच असे नाही, परंतु अन्य दोन खेळाडूंच्या तुलनेत त्याचे पारडे जड नक्की आहे.  पृथ्वी आणि मयांक यांच्यापैकी एक नक्की कसोटी पदार्पण करेल. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटीत पृथ्वीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला, परंतु त्याला संधी मिळाली नाही. सलामीबरोबरच गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघात आणखी काही बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजाच्या जागी संघात आर अश्विनला संधी मिळू शकते, तर उमेश यादवही पुनरागमन करणार आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहली