राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : गुरुवारपासून सुरू होत असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी BCCI ने भारताचे अंतिम 12 खेळाडू जाहीर केले. BCCI ने प्रथमच सामन्याच्या आदल्या दिवशी संघ जाहीर केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्घ सलामीला कोण उतरणार या प्रश्नाचे उत्तर मिळाले. मुंबईकर पृथ्वी शॉ याला गुरुवारच्या सामन्यात संधी देण्यात आली असून तो लोकेश राहुलसह सलामीला उतरणार आहे. भारताकडून कसोटी पदार्पण करणारा शॉ हा २९३वा खेळाडू ठरणार आहे.
या सामन्यासाठी BCCI ने मयांक अग्रवाल, हनुमा विहारी आणि मोहम्मद सिराज यांना बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 18 वर्षीय पृथ्वीने स्थानिक क्रिकेट सामन्यांत खोऱ्याने धावा केल्या आहेत. त्याशिवाय त्याने भारताला 19 वर्षांखालील विश्वचषकही जिंकून दिला आहे. त्याने 14 प्रथम श्रेणी सामन्यांत 56.27च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शॉचा भारतीय संघात समावेश होता, परंतु त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळाली नव्हती.
भारतीय संघ : विराट कोहली ( कर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.