राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडीज : आशिया चषक स्पर्धेतील जेतेपदानंतर भारतीय क्रिकेट संघाने आपला मोर्चा वेस्ट इंडीज कसोटी मालिकेकडे वळवला आहे. या मालिकेतून कर्णधार विराट कोहलीही वरिष्ठ संघात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे विराट आणि वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर यांच्यातील द्वंद्व पाहण्याची उत्सुकता लागली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ आणि मोहम्मद सिराज या युवा खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
कर्नाटकच्या अग्रवालने भारत A संघाकडून खोऱ्याने धावा केल्या आहेत आणि त्यामुळेच त्याला कसोटी संघात संधी मिळाली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सराव सामन्यात बोर्ड प्रेसिडंट संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने 90 धावांची खेळी केली आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत त्याला संधी मिळण्याची अपेक्षा आहे. अग्रवालने बुधवारी भारताच्या वरिष्ठ खेळाडूंसोबत नेटमध्ये फलंदाजीचा कसून सराव केला. BCCI ने त्याच्या सरावाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला.