- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर, लोकमत
वेस्ट इंडिजचा संघ विश्वविजेता आहे. मात्र त्यांची कामगिरी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने खालावली आहे. तरीही भारताच्या दोन्ही विजयाचे महत्त्व कमी होत नाही. हे सामने फ्लोरिडामध्ये होत आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर खेळण्याचा जो फायदा मिळाला असता तो मिळू शकलेला नाही. भारताने पहिल्या टी२० सामन्यात शानदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजचा खेळ फारसा चांगला नव्हता. दुसऱ्या सामन्यातदेखील वेस्ट इंडिजचा खेळ त्यांना विजयी करू शकला नसता. या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईसच्या नियमानुसार लागला. पुढच्या दौºयाचा विचार करता भारताची कामगिरी नक्कीच चांगली होती.
रोहित शर्मा याने त्याचा फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने दुसºया सामन्यात अर्धशतक झळकावले. या डावात त्याने सर्वाधिक षटकारांचा विक्रम केला. त्याने गेलला मागे टाकले. त्यामुळेच समजते की रोहित शर्मा प्रतिस्पर्धी संघावर भारी पडतो. त्याच्या खेळात नजाकत आहे आणि त्याच्यात क्षमता आहे. त्याचा पुरेपूर वापर तो करतो. मर्यादित षटकांचा विचार करता तो सर्वोत्तम फलंदाज आहे.
नवदीप सैनी याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना चकीत केले आहे. त्याच्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजांना आणखी एक पर्याय मिळाला. त्याने अशीच कामगिरी पुढे देखील केली. तर इतर नियमित वेगवान गोलंदाजांना टक्कर देऊ शकतो. पंतने दोन सामन्यात चुकीचे फटके खेळले. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. धोनीची जागा घेण्यासाठी पंतला त्याच्या क्षमतेची जाण करून घ्यावी लागेल. तो फक्त २१ वर्षांचा आहे. त्याने आतापर्यंत दोन शतके झळकावली आहे. त्यामुळे त्याच्यावर सातत्याने टीका करू नये. त्याने आपल्या क्षमतेनुसार खेळ करावा.