गयाना : दीपक चहार याने चार धावा देत तीन बळी या शानदार गोलंदाजीनंतर मोक्याच्या वेळी रिषभ पंत आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावत भारताला तिसऱ्या आणि अखेरच्या टी २० सामन्यात देखील विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजने भारताला १४७ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य भारताने १९.१ षटकांतच ३ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा करत पूर्ण केले.
पावसानंतर मैदानावर ओलं असल्याने सामन्याला उशिराने सुरूवात झाली. वेस्ट इंडिजची सुरूवात खराब झाली. आघाडीची फळी स्वस्तात बाद झाल्यावर किरोन पोलार्ड याने ४५ चेंडूत ५८ धावा करत संघाचा डाव सावरला. त्याच्या आणि रॉवमेन पॉवेल (२० चेंडूत ३२ धावा) याच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने २० षटकांत ६ बाद १४६ धावा केल्या. भारताकडून नवदीप सैनी याने दोन तर पर्दापण करणाºया राहुल चहार याने एक बळी घेतला. प्रत्युत्तरात भारताची संघात सुरूवात देखील चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन ३ धावांवर बाद झाला. लोकेश राहुल याने १८ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली (५९ धावा) आणि रिषभ पंत यांनी १०६ धावांची शानदार भागिदारी केली. भारताचा विजय टप्प्यात आल्यानंतर कोहलीला ओशाने थॉमस याने बाद केले.
त्यानंतर रिषभ पंत याने आपले अर्धशतक पूर्ण करीत भारताला सोपा विजय मिळवून दिला. रिषभ पंत याने ४२ चेंडूत ६५ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार लगावले. त्याची ही खेळी कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाने केलेली सर्वोच्च खेळी ठरली. त्याने महेंद्र सिंह धोनीला या बाबतीत मागे टाकले.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : किरोन पोलार्ड ५८, निकोलस पुरन १७, रॉवमन पॉवेल ३२, कार्लोस ब्रेथवेट १०, अवांतर ८, एकुण २० षटकांत ६ बाद १४६ धावा, गोलंदाजी - दीपक चहार ३/४, नवदीप सैनी २/३२, राहूल चहार १/२७.
भारत : लोकेश राहूल १८, विराट कोहली ५९, रिषभ पंत ६५, एकूण २० षटकांत ३ बाद १५० धावा गोलंदाजी - ओशाने थॉमस २/२९, अॅलेन १/१८