Join us  

India vs West Indies 2nd ODI: भुवनेश्वरचा भेदक मारा, भारताची वेस्ट इंडिजवर मात

कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 3:55 AM

Open in App

पोर्ट ऑफ स्पेन, भारत वि. वेस्ट इंडिज :  कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने दिलेल्या 280 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली होती. त्यात पावसाचा अडथळा आल्यानंतर विंडीजला 270 धावांचे सुधारीत लक्ष्य देण्यात आले. मात्र लुईस (65) आणि निकोलस पुरन (42) यांनी दमदार खेळ करत सामन्यात रंगत आणली. मात्र भुवनेश्वर कुमारने विंडीजची मधली फळी कापून काढत भारताचा विजय निश्चित केला. अखेरीस विंडीजचा संपूर्ण डाव 210 धावांत संपुष्टात आला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 4, शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन तर खलील अहमद आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक बळी टिपला. 

तत्पूर्वी कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधले 42वे शतक साजरे केले. कोहलीच्या या शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 279 धावा फटकावत वेस्ट इंडिजसमोर 280 धावांचे आव्हान ठेवले.भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही. शिखर धवन 2 आणि रोहित शर्मा 18 धावांवर बाद झाले. पण त्यानंतर विराट कोहलीने शतक झळकावत संघाची गाडी रुळावर आणली. कोहलीने 14 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 120 धावा केल्या. श्रेयस अय्यरनेही यावेळी दमदार फलंदाजी केली. श्रेयसने 68 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 71 धावा केल्या.कोहलीने 42वे शतक ठोकत रचले बरेच विक्रमविराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 42वे शतक साजरे केले. पण हे 42वे शतक साजरे करताना कोहलीने बऱ्याच विक्रमांना गवसणी घातली आहे. या सामन्यात कोहलीने 14 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 120 धावांची खेळी साकारली. कोहलीने या सामन्यात 19 धावा जेवहा केल्या, तेव्हा त्याने इतिहास रचला. कारण त्यावेळी वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा कोहली हा अव्वल फलंदाज ठरला. कोहलीने यावेळी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांना पिछाडीवर सोडले. मियांदाद यांच्या नावावर 1930 धावा होत्या. या धावा त्यांनी 64 डावांमध्ये केल्या होत्या. कोहलीने मात्र हा धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. हा विक्रम मोडीत काढताना कोहली मियांदाद यांच्यापेक्षी 34 डाव कमी खेळला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी कोहली 11, 286 धावांवर होता. पण या सामन्यात दमदार खेळी साकारताना कोहलीने गांगुलीला पिछाडीवर टाकले आहे. कारण गांगुलीच्या 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11,363 धावा होत्या. या धावा कोहलीने आजच्या खेळीमध्ये ओलांडल्या आहेत. आता सर्वाधिक धावांच्या यादीत कोहलीच्या पुढे सात खेळाडू आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनच्या नावावावर 18, 426 धावा आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीभुवनेश्वर कुमारभारतीय क्रिकेट संघ