Join us

India vs West Indies, 1st Test : बूम बूम बुमराह; भारतीय गोलंदाजाचा विश्वविक्रम, कोणलाही जमला नाही असा पराक्रम

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने 318 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भेदक गोलंदाजी करणाऱ्या बुमराहने विश्वविक्रमाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 09:19 IST

Open in App

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. उप कर्णधार अजिंक्य रहाणेची ( 102) शतकी खेळी आणि हनुमा विहारी ( 93) व कर्णधार विराट कोहली ( 51) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 419 धावांचे आव्हान उभे केले. 420 धावांचे लक्ष्य पाहूनच वेस्ट इंडिज संघाचे धाबे दणाणले होते, त्या बुमराहने त्यांना हतबल केले. बुमराहने अवघ्या 7 धावा देत विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी विंडीजचा डाव 100 धावांत गुंडाळण्यात हातभार लावला. भारताने 318 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भेदक गोलंदाजी करणाऱ्या बुमराहने विश्वविक्रमाची नोंद केली.

रहाणे आणि विहारी यांनी दमदार खेळी करताना भारताला दुसऱ्या डावात 7 बाद 343 धावांचा डोंगर उभा करून दिला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांची आपली भूमिका चोख बजावली. विंडीजचे आघाडीचे पाच फलंदाज दुहेरी आकडा न गाठताच माघारी परतले. केमार रोच ( 38) हा विंडीजकडून सर्वोत्तम कामगिरी करणारा फलंदाज ठरला. बुमराहने 8 षटकांत 4 निर्धाव षटकं टाकली आणि 7 धावांत 5 फलंदाज बाद केले. इशांतने 9.5 षटकांत 31 धावांत 3 विकेट, तर मोहम्मद शमीने 5 षटकांत 13 धावांत 2 विकेट घेतल्या. 

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कमी धावा देऊन पाच विकेट घेणारा बुमराह हा यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम वेंकटेश राजू ( 6 /12 वि. श्रीलंका, 1990) याच्या नावावर होता. पण, याहीपेक्षा या पाच विकेट बुमराहसाठी विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या ठरल्या. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज अशा चारही देशांत एकाच कसोटीत पाच विकेट घेण्याचा पराक्रम करणारा बुमराह हा पहिला भारतीय आणि आशियाई गोलंदाज ठरला. वकार युनिस, वसीम अक्रम, कपील देव, मुथय्या मुरलीधरन, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आदी दिग्गजांनाही अशी कामगिरी करता आलेली नाही. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजजसप्रित बुमराहअजिंक्य रहाणेविराट कोहली