भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात विंडीज कर्णधार किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ट्वेंटी-20 मालिकेनंतर वन डे मालिकेतही विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूनं लागतो, याची सर्वांना उत्सुकता होती. नाणेफेकीचा कौल पोलार्डच्या बाजूनं लागला. पण, विडींज कर्णधारानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या 'मन की बात' ओळखली. त्याच्या निर्णयानं कोहली भलताच खूश झालेला पाहायला मिळाला. जाणून घेऊया नक्की काय झालं.
या खेळपट्टीचा नूर पाहता नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी करणे योग्य ठरेल, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल विंडीजच्या पारड्यात पडला, पण कर्णधार पोलार्डनं घेतलेला निर्णय ऐकून सर्वांना धक्का बसला. त्यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानं शेजारी उभा असलेला कोहली भलताच आनंदी झाला. तो म्हणाला,''मलाही नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीच करायची होती. पोलार्डच्या निर्णयानं आश्चर्याचा धक्का बसला. त्यानं माझ्या मनातलं ओळखलं. चेन्नईच्या वातावरणात रात्रीच्या सत्रात फलंदाजी करणं अवघड असते. ही खेळपट्टी ड्राय आहे. त्यामुळे पोलार्डच्या गोलंदाजीच्या निर्णयानं आश्चर्यचकीत केलं. प्रथम फलंदाजी ही नेहमीच आमची जमेची बाजू राहिली आहे.''
वेस्ट इंडिजचा संघ - शे होप, सुनील अॅब्रीस, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, रोस्टन चेस, किरॉन पोलार्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श, अल्झारी जोसेफ, शेल्डन कोट्रेल
भारताचा संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल,
विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी