Asia Cup 2025 IND vs UAE, Third Umpire Given Out Suryakumar Yadav Withdrawn Appeal : आशिया कप स्पर्धेतील आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाने यूएईच्या संघाचा डाव १३.१ षटकांत ५७ धावांवर आटोपले. चांगली सुरुवात केल्यावर युएईच्या संघाने पाठोपाठ विकेट गमावल्या. जसप्रीत बुमराहनं पहिली विकेट घेतल्यावर कुलदीपच्या फिरकीतील जादू पाहायला मिळाली. यादरम्यान एक भन्नाट किस्सा घडला. रुमाल पडला अन् त्यामुळे UAE चा बॅटर धावबाद झाला. थर्ड अंपायरनं रिप्ले पाहून त्याला आउटही दिले. पण हे सगळं एका रुमालामुळं घडल्याचे लक्षात घेऊन भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं अपील मागे घेतले अन् आउट झालेला UAE चा बॅटर नॉट आउट ठरला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
नेमकं काय घडलं?
यूएईच्या डावातील १३ व्या षटकात शिवम दुबे गोलंदाजी करत होता. या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी त्याने रनअप घेतले. चेंडूही टाकला.पण त्यावेळी त्यानं कंबरेला खेचलेला रुमाल पडला. त्यामुळे युएईचा बॅटर जुनैदच लक्ष विचलित झालं. चेंडू निर्धाव खेळल्यावर तो क्रीज बाहेर आला अन् शिवम दुबेला रुमाल पडलाय सांगताना तो तसाच थांबून राहिला. विकेट मागे असलेल्या संजूनं थेट थ्रो मारत डाव साधला. थर्ड अंपायरनं विकेटही दिली. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवनं खिलाडूवृत्तीच दर्शन दाखवून देत अपील मागे घेत UAE च्या बॅटरला खेळण्याची एक संधी दिली. पण जुनैदला याचा फारसा फायदा उठवता आला नाही. पुढच्या चेंडूवरच तो ज्याने एक संधी दिली त्या सूर्यकुमार यादवच्या हाती झेल देऊन खातेही न उघडता माघारी फिरला. हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
...अन् शिवम दुबेवर खेळललेला डाव यशस्वी
शिवम दुबे हा ऑलराउंडर क्रिकेटर आहे. पण तो सर्वाधिक चर्चेत हा बॅटिंगमुळेच असतो. पण आता टीम इंडियाने त्याला बॅटिंगसह बॉलिंगमध्येही आजमावण्याचा प्लॅन आखला आहे. आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यातून याची सुरुवात झाली. संघ हलका असला तरी जिथं जसप्रीत बुमराहनं फक्त एक विकेट घेतली तिथं शिवम दुबेनं २ षटकात ४ धावा खर्च करत ३ विकेट्सचा डाव साधला. तो गोलंदाजीतील सातत्य कायम राखणार का? ते पाहण्याजोगे असेल.