कोलंबो, भारत वि. श्रीलंकाः भारतीय महिला संघाने आयसीसी महिला चॅम्पियनशिप क्रिकेटच्या पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकेवर नऊ विकेट राखून विजय मिळवला. महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाने नाबाद 73 धावांची खेळी करताना 99 धावांचे विजयी लक्ष्य सहज पार करून दिले. पूनम राऊतने 24 धावा केल्या.
तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत यजमान श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार चमारी जयागनी ( 33) आणि श्रीपाली विराक्कोडी ( 26) या दोघी वगळता श्रीलंकेच्या खेळाडूंना भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ तग धरता आला नाही. मानसी जोशीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तिला झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चांगली साथ दिली. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 35.1 षटकांत 98 धावांवर माघारी परतला.
भारताने 19.5 षटकांत अवघ्या एका विकेटच्या मोबदल्यात 100 धावा करत लक्ष्य पूर्ण केले. स्मृतीने महिला ट्वेंटी-20 लीगमधील फॉर्म कायम राखताना 76 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 73 धावा केल्या.