India vs Sri Lanka : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं दुसऱ्या वन डे सामन्यात यजमान श्रीलंकेच्या तोंडचा घास पळवला. 276 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे 7 फलंदाज 193 धावांवर माघारी परतले होते. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं दीपक चहरला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले अन् त्यानं भुवनेश्वर कुमार याच्यासह 84 धावांची नाबाद भागीदारी करताना टीम इंडियाला 3 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या विजयासह भारतानं तीन वन डे सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या निकालानंतर टीम इंडियाच्या ताफ्यात आनंद होता, तर श्रीलंकेच्या संघात वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले.
सूर्यकुमार यादवची विकेट मिळाल्यानंतर श्रीलंका संघाचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर हे खूप आनंदात होते. आता श्रीलंकेला हरवणं अवघड असंच त्यांना वाटत होते, परंतु दीपक व भुवीच्या खेळीनं आर्थर यांचा संयमाचा बांध फोडला. तोंडचा विजयाचा घास दूर होत असल्याचे दिसत असताना ऑर्थर यांची चिडचिड सुरू झाली. दीपकची फटकेबाजी पाहून ते आणखी संतापले अन् ड्रेसिंग रुममध्ये जाऊन व्यवस्थापकीय टीमशी वाद घालताना दिसले. त्यांना हा पराभव एवढा जिव्हारी लागला की त्यांनी सामन्यानंतर भर मैदानावर कर्णधार दासून शनाका यांच्यात चांगलीच जुंपल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ( Sri Lanka Head coach Mickey arthur and captain dasun shanaka heated argument)
भुवी ( 3/54) आणि युजवेंद्र चहल ( 3/50) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. दीपकनेही दोन विकेट्स घेत श्रीलंकेला 9 बाद 275 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. सलामीवीर अविष्का फर्नांडो ( 50) आणि चरीथ असलंका ( 65) यांनी अर्धशतक झळकावले. 276 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 7 फलंदाज 193 धावांवर माघारी परतले होते. पण, दीपक ( 69) आणि भुवी ( 19) यांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची भागीदारी करताना संघाला विजय मिळवून दिला.