भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला ट्वेंटी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे नववर्षातील पहिल्या लढतीत टीम इंडियाच्या शिलेदारांचा दमदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागली. गुवाहाटी येथील तो सामना रद्द झाला असला तरी क्रिकेट चाहत्यांच्या प्रेमानं सर्वांच मन जिंकलं. नाणेफेकीनंतर त्वरीत आलेल्या पावसानं खेळ वाया घालवला. तीनवेळा खेळपट्टीची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय झाला. तोपर्यंत चाहते सामना होईल, याच अपेक्षेनं स्टेडियमवरच होते.
सामना रद्द होण्याचे जाहीर होण्यापूर्वीच काही क्रिकेटपटूंनी मैदान सोडल्याची चर्चा आहे. पण, चाहते भर पावसात उभे होते. त्यांचा एक व्हिडीओ बीसीसीआयनं सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत चाहते वंदे मातरम् गात असल्याचे पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा हा जोश पाहून अंगावर शहारे उभे राहतात...
पाहा व्हिडीओ...
IND vs SL, 2nd T20I : इंदूरच्या खेळपट्टीसाठी 'स्पेशल केमिकल'; क्युरेटर्सची अनोखी शक्कल
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यावरही अनिश्चिततेचं संकट असल्याची चिन्ह आहेत, परंतु यावेळी क्रिकेटप्रेमी व सामना यांच्यात पाऊस नव्हे, तर दव फॅक्टर खोडा घालू शकतो. पण, त्यावर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशननं जालीम उपाय शोधला आहे. त्यांनी दव फॅक्टरवर मात करण्यासाठी स्पेशल केमिकल मागवले आहे.
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार मुख्य क्युरेटर समंदर सिंग चौहान यांनी सांगितले की,''खेळपट्टीवर दव असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मैदानावर स्पेशल केमिकलची फवारणी केली जात आहे. शिवाय गेल्या तीन दिवसांपासून मैदानावरील गवतावर पाण्याची फवारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे दव कमी निर्माण होतील. चाहत्यांना या सामन्यात चौकार- षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे.''