Join us  

'तुम्हीच सांगा बेस्ट 11 खेळाडू, त्यांना घेऊनच खेळू', पराभवानंतर कोहलीला राग अनावर

पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून पहिल्याच कसोटी मालिका पराभवाचा सामना करणा-या भारतीय कर्णधार विराट कोहलीवर काय परिणाम झाला हे सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 10:00 PM

Open in App

सेंचुरियन : केपटाऊन पाठोपाठ सेंचुरियन कसोटीतही भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. आफ्रिकेच्या संघाने भारताला 135  धावांनी पराभूत करुन मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून पहिल्यांदाच कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करणा-या भारतीय कर्णधार विराट कोहलीवर काय परिणाम झाला हे सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं. दक्षिण आफ्रिकेच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर कोहली चांगलाच संतापला. पराभवानंतर पत्रकार परिषदेत कोहलीवर एकाहून एक प्रश्नांचा भडिमार झाला. संघामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलाबाबत आफ्रिकेच्या पत्रकाराने प्रश्न विचारला. तुम्ही प्रत्येक सामन्यात संघ का बदलतात ? एकच संघ घेऊन मैदानात का नाही उतरत? असा प्रश्न पत्रकाराने कोहलीला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी कोहलीने पत्रकाराला, सातत्याने बदल करून आम्ही किती सामने जिंकलेत? असा प्रतिप्रश्न विचारला. त्याचं उत्तर देताना पत्रकाराने तुम्ही जिंकला आहात पण केवळ घरच्या मैदानावर असं म्हटलं. त्याला उत्तर देताना आम्ही 21 सामने जिंकलो आणि केवळ 2 सामने हरलो असं कोहली म्हणाला. वाद वाढत असल्याचं पाहून मीडिया मॅनेजरने मध्यस्थी केली. त्यानंतर आणखी एका पत्रकाराने बेस्ट प्लेइंग इलेव्हनबाबत प्रश्न विचारला त्यावर कोहलीच राग अनावर झाला. तुम्हीच सांगा बेस्ट प्लेइंग इलेव्हन कोणती आहे. आम्ही तोच संघ घेऊन मैदानात उतरू असं कोहली म्हणाला. आम्ही निकालानुसार प्लेइंग इलेव्हन निवडत नाही असंही कोहली म्हणाला.   पराभवानंतर विराट कोहलीने फलंदाजांवर फोडलं खापर - पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांवर खापर फोडलं आहे. गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली, पण फलंदाजांच्या अपयशामुळे पराभवाचा सामना करावा लागला असं कोहली म्हणाला. 

सामन्यानंतर बोलताना कोहली म्हणाला, आम्हाला चांगल्या भागीदाऱ्या रचताच आलेल्या नाहीत. गोलंदाजांनी  आपली कामगिरी चांगली बजावली. फलंदाजांनी मात्र अपेक्षेप्रमाणे खेळ केला नाही. आपल्याला फलंदाजांनी निराश केल्याचं कोहलीनं सामन्यानंतर बोलताना स्पष्ट केलं. ढिसाळ क्षेत्ररक्षण हेही पराभवाचे एक कारण असल्याचे कोहली म्हणाला.भारतानं मालिकाच गमावल्यामुळे आता माझ्या 150 धावांच्या खेळीचे काहीच महत्त्व राहिलेले नाही. आम्ही जर जिंकलो असतो तर 30 धावांचे महत्त्वही अधिक झाले असते अशा शब्दांत कोहलीने आपली नाराजी जाहीर केली. आम्ही क्षेत्ररक्षण करतानाही चुका केल्या. दक्षिण आफ्रिका संघानं मात्र, या चुका केल्या नाहीत आणि म्हणूनच तो संघ विजेता ठरला आहे. 

पहिल्या कसोटीतील पराभवासाठीही विराट कोहलीने फलंदाजांना जबाबदार धरलं होतं, आणि आता दुस-या कसोटी सामन्यानंतरही कोहलीने फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे . 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८विराट कोहली